PMRDA: उद्योजकांच्या टीकेनंतर पीएमआरडीएला जाग
PMRDA:

चाकणच्या रस्त्यांची आयुक्तांकडून पाहणी; कामांना वेग देण्याचे आदेश
PMRDA: चाकण औद्योगिक परिसरातील रस्त्यांची झालेली दूरवस्था आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर उद्योजकांनी प्रशासनाच्या कारभारावर थेट टीका केल्यानंतर अखेर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाला जाग आली आहे.
पुण्यात नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत उद्योजकांनी रस्त्यांच्या प्रश्नाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, प्रत्यक्ष कामाऐवजी केवळ कागदोपत्री कार्यवाही सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी चाकण परिसरातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
चाकण परिसरातील उद्योगांसाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची वर्षानुवर्षे दूरवस्था असताना आता प्रशासनाकडून कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि दळणवळण सुरळीत करण्यासाठी पीएमआरडीएकडून १७ किलोमीटर लांबीच्या सात रस्त्यांचा विकास करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
मात्र, उद्योजकांच्या तीव्र नाराजीनंतरच या कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहणी केल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कुरुळी फाटा- निघोजे, खालुंब्रे- एमआयडीसी फेज-२, चिखली- मोई, चऱ्होली खुर्द- आळंदी यांसह विविध मार्गांचा विकास करण्यात येणार आहे. कुरुळी फाटा- निघोजे रस्त्याचे काम १५ दिवसांच्या बार चार्टनुसार पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निधी असूनही दिरंगाई
या सात रस्त्यांसाठी तब्बल १००.१४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता असून, पुढील दहा वर्षांची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारीही संबंधित ठेकेदारावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे एवढा मोठा निधी उपलब्ध असतानाही रस्त्यांच्या दूरवस्थेचा प्रश्न निर्माण का झाला, याचे उत्तर प्रशासनाने देण्याची गरज आहे.





