PMRDA Action: मोईमध्ये पीएमआरडीएचा बुलडोझर! ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त; ३५ हेक्टर क्षेत्र रिकामे
PMRDA Action: राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि महापालिका सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात पार पडली मोहीम; कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठा फौजफाटा तैनात.

PMRDA Action – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खेड तालुक्यातील मोई येथे अनधिकृत पत्राशेड आणि व्यावसायिक बांधकामांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई केली. सलग दोन दिवस चाललेल्या या मोहिमेत सुमारे 35 हेक्टर क्षेत्रावरील 680 अनधिकृत पत्राशेड व बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 आणि 14 जुलै रोजी ही कारवाई राबविण्यात आली.
मोई येथील 68 गट क्रमांकांमधील अनधिकृत पत्राशेड आणि व्यावसायिक बांधकामांवर बुलडोझर चालवत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईसाठी सलग 20 तास सुमारे 650 पोलीस अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (एमएसएफ) 50 जवान, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुरक्षा रक्षक तसेच पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे 30 जवान तैनात करण्यात आले होते.
कारवाईदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आले होते. 12 पोकलॅन, 12 जेसीबी, ट्रॅक्टर, टिपर, हायड्राक्रेन आणि गॅस कटर यांसारख्या आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने अनधिकृत पत्राशेड आणि बांधकामे हटविण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिका, खेड येथील वीज वितरण विभाग, आरोग्य विभाग आणि खेड पंचायत समिती यांच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.
“पीएमआरडीएच्या हद्दीत कोणत्याही प्रकारची अनधिकृत पत्राशेड अथवा बेकायदेशीर बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत. मोई परिसरातील कारवाई ही व्यापक धडक मोहिमेचा भाग असून, नागरिकांनी अशा अनधिकृत बांधकामांच्या आमिषाला बळी पडू नये. आगामी काळातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील.”
-डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त पीएमआरडीए




