PMPML News: पीएमपी राबविणार ‘पंक्चुॲलिटी वीक’! बस वेळेवर धावण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन

प्रभात वृत्तसेवा
पुणे – प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली पीएमपी बससेवा प्रवाशांना वेळेवर मिळावी, नियोजित वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी पीएमपीकडून ‘पंक्चुॲलिटी वीक’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना पीएमपी सेवा वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वेळप्रसंगी कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याने सेवेत शिस्तबद्धता आणण्यास मदत होईल.
पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी दोन आठवड्यांपूर्वी फिल्ड वीक आणि स्वच्छता आठवडा हे उपक्रम राबविले. त्या वेळी बससेवेतील स्वच्छता, तांत्रिक स्थिती, कर्मचारी कामकाज आणि प्रवाशांच्या तक्रारींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला होता. त्यातून समोर आलेल्या त्रुटींवर सुधारणा सुरू असून, आता पुढील टप्प्यात वक्तशीरपणा हा केंद्रबिंदू मानून ‘पंक्चुॲलिटी वीक’ राबवला जाणार आहे.
या आठवड्यात बस फेऱ्यांची वेळपालन टक्केवारी, उशिराने धावणाऱ्या मार्गांचा स्वतंत्र आढावा, तसेच वारंवार फेऱ्या रद्द होणाऱ्या मार्गांची तपासणी केली जाणार आहे. तांत्रिक बिघाडामुळे होणारे विलंब कमी करण्यासाठी वर्कशॉप पातळीवर तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.प्रवाशांच्या दृष्टीने बस वेळेवर मिळणे, ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे.
बस उशिराने आल्यास थांब्यावर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते, तसेच कर्मचाऱ्यांचे सतत गैरहजर राहणे, उशिरा कामावर येणे आणि नियमांचे पालन न करणे, यामुळे बससेवेत अडथळे निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर ‘पंक्चुॲलिटी वीक’ दरम्यान दररोज आढावा बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वेळेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद ठेवून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. पंक्चुॲलिटी वीक हा त्याचाच भाग असून, प्रवाशांना वेळेत सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी दिली.



