Pune Gramin | चाकण एमआयडीसीत पीएमपीएमएलची बससेवा सुरू..

प्रभात वृत्तसेवा
शिंदेवासुली – चाकण औद्योगिक परिसरात अखेर पीएमपीएमएलची बहुप्रतिक्षित बससेवा सुरू करण्यात आली असून, कामगार, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक वाहतुकीचा अभाव होता. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही सेवा प्रत्यक्षात उतरली आहे.शनिवारी (दि. 2) एनटीबी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी परिसरात या बससेवेचे उद्घाटन फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे संचालक कमल कचोलिया यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी फेडरेशनचे सीईओ दिलीप बटवाल, विनोद जैन, गोविंद पानसरे, एनटीबीचे महाव्यवस्थापक ए. राजा, पीएमपीएमएलचे राजेश जाधव, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या बससेवेमुळे कामगारांना वेळेवर पोहोचणे सोपे होईल, अपघातांची संख्या कमी होईल आणि रस्त्यावरील खासगी वाहनांचा भार कमी होईल. परिणामी प्रदूषणात घट होईल. महिला कामगारांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये महिला कंडक्टर नियुक्त करण्यात येणार आहे, ही एक विशेष बाब आहे. पीएमपीएमएलच्या या नव्या बससेवेने चाकण परिसरातील सार्वजनिक वाहतुकीतील मोठी पोकळी भरून निघणार आहे. फेडरेशनच्या नेतृत्वाखाली झालेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून, ही सेवा भविष्यात आणखी विस्तारली जाण्याची अपेक्षा आहे.
वर्तुळाकार मार्ग..
आंबेठाण चौक – आळंदी फाटा – निघोजे फाटा – मर्सिडीज चौक – स्कोडा गेट 1 – सिग्मा चौक – एचपी चौक – बजाज कंपनी – महाळुंगे – खराबवाडी – चाकण – आंबेठाण चौक. सेवा वेळ: दर अर्ध्या तासाने एक बस धावणार.
नवीन बससेवा..
भोसरी – निघोजे गाव मार्ग – या नव्या सेवेतून भोसरी ते निघोजे गावदरम्यान बस चालवली जाणार असून, यामार्गे अनेक कंपन्यांतील कामगारांना मोठा लाभ होणार आहे. मार्ग : भोसरी – चाकण रोड – मोशी जकात नाका – मोशी गाव – चिंबळी फाटा – कुरळी फाटा – निघोजे फाटा – मर्सिडीज चौक – स्कोडा गेट 2 – सिग्मा – एन्जुरन्स – महिंद्रा कंपनी गेट 1 व 2 – निघोजे गाव.




