PMPML Bus : परीक्षेला जाताय? पीएमपी बसमध्ये आता मिळणार ‘हे’ खास फायदे; जाणून घ्या
PMPML Bus : परीक्षा काळात वाहतूक कोंडीचा अडथळा नको! शालेय व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार अतिरिक्त बसेस सोडण्याचा प्रशासनाचा निर्णय.

PMPML Bus – राज्यातील उच्च माध्यमिक परीक्षा आजपासून (दि. १०), तर माध्यमिक शालांत परीक्षा २० तारखेपासून सुरू होत आहेत. या परीक्षांच्या काळात हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी पीएमपीएमएलच्या बससेवेचा वापर करत असतात. या महत्त्वाच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी कोणतीही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पीएमपीएमएलने अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार परीक्षा कालावधीमध्ये बस पासधारक विद्यार्थ्यांचे बस पास त्यांचे निवासस्थान आणि परीक्षा केंद्र या दरम्यान वैध मानण्यात येतील. या विद्यार्थ्यांना सदर प्रवासासाठी वेगळे तिकीट घ्यावे लागणार नाही, तसेच परीक्षा कालावधीमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढील दरवाजातून प्रवेशाची मुभा राहील. याशिवाय परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्राधान्याने बससेवा उपलब्ध होण्यासाठी गर्दीच्या बस थांब्यांवर पर्यवेक्षकीय सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे,
तसेच शालेय व्यवस्थापनाकडून सूचना आल्यास अतिरिक्त बसेसचे देखील नियोजन करण्यात येणार आहे.१० वी आणि १२ वीच्या सर्व परीक्षार्थी व त्यांच्या पालकांनी पीएमपीएमएलने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची नोंद घ्यावी व या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलने केले आहे.




