PMP: पीएमपीच्या कारभारावरून नगरसेवक आक्रमक
PMP:

सर्वसाधारण सभेत वाढती संचलन तूट, बसच्या दूरवस्थेवरून नाराजी
PMP: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी प्रशासनाच्या कारभारावर नगरसेवकांनी जोरदार टीका केली. वाढती संचलन तूट, बसची देखभाल, कर्मचाऱ्यांच्या आरोग्य योजनेतील त्रुटी, अध्यक्षांसाठी नवीन वाहन खरेदी, जाहिरात उत्पन्न, भरती व पदोन्नतीतील कथित अनियमितता अशा विविध मुद्द्यांवर प्रशासनाला जाब विचारला.
नगरसेवक हरिदास चरवड यांनी पीएमपीच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संचलन तुटीचा बोजा वर्षागणिक वाढत असताना खर्चावर नियंत्रण का ठेवले जात नाही, असा सवाल केला. अध्यक्षांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाल्यानंतर नवीन वाहन खरेदी करण्याऐवजी विम्याच्या माध्यमातून जुने वाहन दुरुस्त करून वापरता आले असते, असे सांगत त्यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला.
पृथ्वीराज सुतार यांनी पीएमपीच्या वाढत्या संचलन तुटीमागील कारणांचा शोध घेण्याची गरज व्यक्त करत, भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि त्यावरील चौकशी अहवाल जाहीर करण्याची मागणी केली.
वैशाली बनकर यांनी कंत्राटी बसच्या बिघाडाचा मुद्दा उपस्थित करत, दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना चालकाच्या दरवाजातून उतरावे लागल्याची घटना सभागृहात मांडली.
ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी बसचा भरधाव वेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि बसथांब्यांवर वेळापत्रक नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
महेश वाबळे यांनी वातानुकूलित बसमधील बिघाड, देखभालीतील निष्काळजीपणा आणि निकृष्ट दर्जाच्या सुट्या भागांच्या वापराचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय बसथांब्यांवरील जाहिरातींमधून महसूल वाढविण्यासाठी ठोस धोरण राबविण्याची मागणी केली.
प्रियंका पठारे यांनी अहिल्यानगर रस्त्यावरील बीआरटी हटविल्यानंतर त्या मार्गावर पुन्हा पीएमपी बसथांबे सुरू करण्याची मागणी केली. याशिवाय महिला सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना, शववाहिकांची संख्या वाढविणे आणि पुणे-पिंपरी-चिंचवड शहरांतील बससेवा अधिक सक्षम करण्याची मागणीही केली.





