Hydrogen Bus : प्रदूषणमुक्त प्रवासासाठी पुण्यात हायड्रोजन बस दाखल; लवकरच घेणार चाचणी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) आता पर्यावरणपूरक प्रवासाच्या दिशेने (Hydrogen Bus) वाटचाल करत आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) यांच्या सहकार्याने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) आणि टाटा यांनी संयुक्तपणे विकसित केलेली हायड्रोजन बस (Hydrogen Bus) पुण्यात दाखल झाली आहे.
या बसची चाचणी पुढील आठवडाभर इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (आयडीटीआर) संस्थेतर्फे शहरातील विविध मार्गांवर घेण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.
पुण्यातील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी पीएमपी प्रशासन पर्यायी आणि पर्यावरणपूरक वाहनांवर लक्ष केंद्रित करत आहे. हायड्रोजन बस ही पूर्णपणे प्रदूषणमुक्त असून, ती चालवताना कार्बन उत्सर्जन होत नाही. यामुळे शहरातील हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. बुधवारी दाखल झालेल्या या हायड्रोजन बसच्या चाचणीला लवकरच सुरुवात होणार असून, यशस्वी चाचणीनंतर पुण्याच्या रस्त्यांवर या बस नियमित धावण्याची शक्यता आहे.
हायड्रोजन बस दाखल झाले असून, पुढील एक आठवडा चाचणी होणार आहे. यशस्वी चाचणी झाल्यानंतर बस खरेदीचा निर्णय होणार आहे. शहरातील विविध भागात चाचणी घेण्यात येणार आहे.
– पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी





