PMC Schools – महापालिकेकडून शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या शाळांपैकी सात शाळा अतिधोकादायक अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच, आठ शाळांचा काही भाग धोकादायक ठरल्याने त्या भागाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या भवन विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही बाब उघड झाली आहे. या धोकादायक शाळा पाडून त्या जागी नवीन शाळा उभारण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. महापालिकेच्या २५० पेक्षा अधिक प्राथमिक व माध्यमिक शाळा असून त्यामध्ये सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांच्या इमारतींची बांधणी तसेच देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेच्या भवन विभागाकडे आहे. मात्र, शिक्षण मंडळासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात विशेष तरतूद अपेक्षित असतानाही शाळांच्या देखभाल-दुरुस्तीकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या सुमारे २५० पेक्षा अधिक शाळा शहरातील १८० पेक्षा अधिक इमारतींमध्ये चालतात, त्यापैकी अनेक इमारती ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत. शिक्षण विभागाच्या मागणीनुसार मागील वर्षी भवन विभागाने ३५ शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्याचा अहवाल आता प्राप्त झाला असून त्यामध्ये आठ शाळांचा काही भाग धोकादायक असल्याचे तर सात शाळा पूर्णपणे धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी या शाळांमधील वर्ग स्थलांतरित करण्याची शिफारसही भवन विभागाने केली आहे. विशेष म्हणजे या शाळा गेल्या काही वर्षांपासून धोकादायक अवस्थेत असतानाही तेथे वर्ग भरविले जात असल्याची बाबही या अहवालातून पुढे आली आहे. त्यामुळे आता महापालिका या शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीची तसेच नव्या इमारती उभारण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. मात्र, या शाळांमधील वर्ग जवळच्या शाळांमध्ये भरविण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याबाबत शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. “महापालिकेच्या शहरातील ३५ शाळांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये आठ शाळांचा काही भाग धोकादायक असल्याचे तर सात शाळा पूर्णपणे धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात नवीन शाळा बांधणे, तातडीच्या दुरुस्तीची कामे करणे तसेच शाळांमधील भौतिक सुविधा वाढविण्यासाठी ६८ कोटी रुपयांच्या निधीची विशेष तरतूद करण्यात आली आहे.” – पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका या आहेत धोकादायक शाळा – पार्वतीबाई निकम शाळा, संगमवाडी – सावित्रीबाई फुले प्रशाला, भवानी पेठ – अमृता शेतीबा दशावतारी प्राथमिक शाळा – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळा, बोपोडी – कै. महादेश दगडू जाधव प्राथमिक शाळा, येरवडा गाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा, वाकडेवाडी – नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा (जुनी इमारत), नवी खडकी