PMC protest : महापालिकेवर नागरिकांचा हल्लाबोल! कळस, धानोरी, वाघोलीतील पिवळसर पाणीप्रश्नी आंदोलन
PMC protest : कळस, धानोरी, लोहगाव आणि वाघोली परिसरात गेल्या महिनाभरापासून दूषित आणि अनियमित पाणीपुरवठा; संतप्त नागरिकांचे पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन.

PMC protest – कळस, धानोरी, लोहगाव, वाघोलीला होणाऱ्या पिवळसर पाणी पुरवठा प्रश्नी नागरिकांचे दोन गट सोमवारी महापालिकेवर धडकले. यातील एक गट आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करून मागे गेला. नगरसेविका शीतल सावंत, नंदिनी धेंडे, नगरसेवक सुहास टिंगरे ,रवी टिंगरे आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्त्वाखालील नागरिकांनी आंदोलन केले.
प्रभाग एक ते चारमधील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. वरील भागांमध्ये होत असलेला दूषित आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक संतप्त झाले असून, ते याबाबत सतत नाराजी व्यक्त करत आहेत. गेले महिनाभर वारंवार सांगूनही हा प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले. पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करून महापौर, महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी पाणीपुरवठ्यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू होती.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी दूषित पाणीपुरवठा तत्काळ बंद करावा, नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करावा, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या केल्या. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून अनेक भागांमध्ये पिवळसर, अस्वच्छ पाणी येत आहे. जोपर्यंत दूषित पाणीपुरवठ्याची समस्या दूर होत नाही, तोपर्यंत पाणीकपातीचा निर्णय घेऊ नये, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला.




