PMC Overhead Cable Policy : ओव्हरहेड केबल धोरण अंतिम टप्प्यात! विद्रुपीकरण रोखण्यासाठी आयुक्तांचा ‘मास्टर प्लॅन’
PMC Overhead Cable Policy : शहरातील रस्त्यांवरील लोंबकळणाऱ्या केबल्समुळे होणारे विद्रुपीकरण थांबणार; आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा विचार करून धोरण निश्चित.

PMC Overhead Cable Policy : शहरातील ओव्हरहेड केबलच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र धोरण तयार केले असून त्याच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. ‘महाप्रीत’ संस्थेबरोबरही यासंदर्भात चर्चा सुरू असून धोरणाला लवकरच अंतिम स्वरूपात दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
पथ विभागाने हे धोरण आयुक्तांना सादर केले होते. आयुक्तांनी त्यात काही बदल सुचविले आहेत. रस्त्यांवर लोंबकळणाऱ्या ओव्हरहेड केबलमुळे विद्रूपीकरण होत असल्याचे तसेच अपघातांची शक्यता आहे. यामुळे महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून विनापरवाना टाकलेल्या केबल हटविण्याची कारवाई सुरू केली. या कारवाईला केबल टीव्ही आणि ब्रॉडबँड ऑपरेटर असोसिएशनने विरोध केला होता.
असोसिएशनने महापालिकेकडे स्पष्ट नियमावली, धोरण जाहीर करण्याची मागणी केली होती. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना सूचना द्याव्यात, तसेच संबंधितांना विश्वासात घेऊन प्रक्रिया राबवावी, अशीही मागणी केली होती. त्यानंतर पालिकेने ओव्हरहेड केबलसंदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्याचे ठरवले.
धोरणाचे परिणाम तपासणार
प्रस्तावित धोरणामुळे कोणते परिणाम होतील, याचा अभ्यास करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. आर्थिक, तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. शहरातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. यामुळे महापालिकेचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघाल्यास शहराचे विद्रूपीकरणही कमी होणार आहे.





