PMC News : प्रभाग समिती निवडणूक लांबणीवर ? नगरविकासने मागविला अहवाल; पाहा काय आहे वाद
PMC News : क्षेत्रीय कार्यालय पुनर्रचनेत भौगोलिक सुसंगतता नसल्याचा आरोप; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली स्थगितीची मागणी.

PMC News : महापालिकेने केलेल्या क्षेत्रीय कार्यालय व प्रभाग समिती पुनर्रचनेत त्रुटीं असल्याचा आरोप करत समिती रचनेला स्थगिती देण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या मागणीनुसार तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने ७ एप्रिल रोजी पालिकेला दिले आहेत. यामुळे, २१ एप्रिल रोजी होण्याऱ्या क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती अध्यक्षांची निवड लांबणीवर पडण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
क्षेत्रीय कार्यालये व प्रभाग समित्या या मिनी महापालिका म्हणून ओळखल्या जातात. त्याची निवडणूक २१ एप्रिल रोजी होणार होती. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्तीही केली आहे. महापालिकेत राष्ट्रवादीचे दुसऱ्या क्रमांकाचे २७ नगरसेवक असूनही त्यांना क्षेत्रीय कार्यालय पुनर्रचनेनंतर एकाही प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळणार नाही.
दुसरीकडे काँग्रेसचे १५ सदस्य असतानाही त्यांना एक समिती मिळणार आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता असून पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे व्यक्त केल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वरील पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
नगरविकासचे म्हणणे
पालिकेने केलेल्या १५ क्षेत्रीय कार्यालये आणि परिसीमा विभागांच्या पुनर्रचनेमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. या बाबी उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात नमूद केल्या आहेत. तसेच जनहिताच्या दृष्टिने सदर प्रभाग रचनेस स्थगिती देऊन नवीन प्रभाग रचना करण्याचा संबंधितांना आदेश द्यावा अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे आपण आपला अहवाल शासनास तात्काळ सादर करावा.
काय आहे तक्रार ?
महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालये आणि परिसीमा विभागांची पुनर्रचना केली आहे. या प्रक्रियेत भौगोलिक सलगता आणि नैसर्गिक अंतराचा विचार केलेला नाही. यामुळे पुणेकरांना दैनंदिन कामांसाठी घरापासून लांब असलेल्या क्षेत्रीय कार्यालयात जावे लागत आहे. त्यात, विश्रांतवाडी व धानोरी (प्रभाग क्र. १ व २) हे भाग नैसर्गिकरित्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाजवळ असताना, त्यांना दूरच्या नगर रोड कार्यालयाला जोडण्यात आले आहे.
खराडी-वाघोली (प्रभाग क्र. ४) येथील नागरिकांना नगर रोड कार्यालय जवळ असताना, त्यांना तेथून ७ कि.मी. दूर असलेल्या येरवडा कार्यालयात जावे लागत आहे. अशा प्रकारच्या विसंगत रचनेमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही रचना अत्यंत एकांगी असून त्यामध्ये भौगोलिक सुसंगतता व लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेतलेले नाही अशी तक्रार पत्रात केली आहे.






