PMC News – महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून महिलांची उन्नती व सबलीकरणासाठी राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम आता क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. समाज विकास विभागाने गुरुवारी स्थायी समिती बैठकीत १२ क्षेत्रीय कार्यालयांत उपक्रम राबविण्याच्या प्रत्येकी २७ लाखांच्या निविदा आयत्यावेळी मान्यतेसाठी ठेवल्या. त्यावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्षेप घेत प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. मात्र, महिलांसाठी हे उपक्रम आवश्यक असल्याचे सांगत उपसूचद्वारे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला या उपक्रमासाठी प्रत्येकी ३० लाखांचा निधी दिला जाणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला आल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी यास विरोध केला. या उपक्रमाची निविदा प्रक्रिया पाच महिन्यांपूर्वी पूर्ण झाली. मग आता स्थायीत मंजुरीसाठी का आणली, कन्स्ट्रक्शन कंपन्या महिला सबलीकरणाचे धडे कसे देऊन शकतात, त्यांच्याकडे काय यंत्रणा आहे? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर सदर योजना १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये राबवावी व निधी वाटप करावा, तसेच जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च ते १४ मार्च या कालावधीत तो राबवावा, अशी उपसूचना नगरसेवक प्रशांत जगताप, विशाल धनवडे यांनी मांडली. त्यास मंजुरी देण्यात आली आहे. “स्थायी समितीतील चर्चेनुसार महिला सबलीकरणाचे उपक्रम आता महापालिकाच राबविणार आहे. ते क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर राबविण्यात येतील. यासाठी अधिकाऱ्यांकडे निधी दिला जाईल.” – नवल किशोर राम, महापालिका आयुक्त “आधीच्या प्रस्तावानुसार ही योजना ११ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये राबविण्यात येणार होती. मात्र, ही योजना सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये राबवावी, अशी उपसूचना सर्व सदस्यांनी एकमताने केली. त्यानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांना समान निधी देऊन ही योजना राबवली जाईल.” – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती