PMC News : पुणे महापालिकेचे ‘मिशन अन्नदा’! आता भटक्या श्वानांना मिळणार जेवण; १ कोटींची मोठी तरतूद..कारण काय?
PMC News : अडीच लाख भटक्या श्वानांच्या आरोग्यासाठी महापालिका सरसावली; अंदाजपत्रकात १ कोटी रुपयांचा विशेष निधी जाहीर.

PMC News – शहरातील भटक्या व मोकाट श्वानांना आता महापालिकेकडून खाद्य पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी महापलिकेकडून बंगळुरूच्या धर्तीवर पुण्यात ‘मिशन अन्नदा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून, या उपक्रमासाठी महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात १ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी पुणे ही पहिली महापालिका ठरणार आहे.
शहरातील मोकाट श्वानांची जबाबदारी महापालिकेकडे आहे. त्या अंतर्गत महापालिकेने शहरात केलेल्या श्वान गणनेत सुमारे अडीच लाखांपेक्षा अधिक भटके श्वान आढळून आले होते. या श्वानांनी चावा घेतल्यास त्यामुळे रेबीजसारखा जीवघेणा आजार होत असल्याने महापालिकेकडून त्यांना पकडून त्यांचे लसीकरण तसेच संख्या नियंत्रणात राहण्यासाठी निर्बिजीकरण केले जाते. शहरात असलेल्या या मोकाट तसेच भटक्या श्वानांना खाण्यासाठी शहरातील प्राणिप्रेमींकडून खाद्य दिले जाते.
तर, बहुतांश श्वान नागरिकांनी कचरा पेटीत टाकलेला कचरा, खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांच्या परिसरात खाण्यासाठी भटकत असतात. या श्वानांच्या निर्बीजीकरण करण्याची जबाबदारी महापालिकेवर असल्याने अनेकदा या भटक्या श्वानांचे वजन १० किलोपेक्षा कमी असल्यास त्यांना भूल देता येत नाही. त्यामुळे, महापालिकेस त्यांचे वजन वाढविण्यासाठी त्यांना खाद्य द्यावे लागते. तसेच सांभाळावे लागते. तसेच, अनेकदा श्वानांना खायला न मिळाल्यास तसेच ते उपाशी राहिल्यास त्यांचे चावण्याचे प्रमाणही वाढते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने आता या श्वानांना महापालिकेकडून खाद्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, ही स्वतंत्र करण्यात आली आहे.
स्वयंसेवक, संस्थांची घेणार मदत
महापालिकेकडून या उपक्रमांतर्गत श्वानांना खाद्य पुरविण्यासाठी स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्थाची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून शहरातील पाच परिमंडळांतर्गत भटक्या श्वानांसाठी फिडींग पाॅईंट निश्चित केले जाणार आहेत. महापालिकेकडून शहरात सध्या स्वयंसेवी संस्था तसेच महापालिकेकडे श्वानांना खाद्यपदार्थ देत असलेल्या प्राणिप्रेमींकडून आलेल्या मागणीनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने ९० ठिकाणी फिडींगसाठी मान्यता दिली आहे.
मात्र, त्याच वेळी संबंधित ठिकाणाची स्वच्छता, त्यासाठीच्या वेळा ठरवून दिलेल्या असून अशा ठिकाणी माहिती फलकही लावण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याच, धर्तीवर आणखी फिडींग पाॅईट तयार केले जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डाॅ. सारि, असका फुंडे- भोसले यांनी सांगितले.





