PMC News : अधिकारी आता रोज दोन तास प्रभागात; महापालिका आयुक्तांचा कठोर आदेश..वाचा
PMC News : पालिकेच्या प्रलंबित तक्रारींची दखल घेत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दररोज सकाळी दोन तास प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणे बंधनकारक केले आहे.

PMC News – महापालिकेकडून नागरिकांसाठी शहरात विविध विकासकामे, प्रकल्प, तसेच सोयीसुविधा दिल्या जातात. मात्र, संबधित ठिकाणी योग्य पद्धतीने काम होत नसल्यास नागरिकांकडून क्षेत्रीय कार्यालय, महापालिका आयुक्त कार्यालय, तसेच पालिकेच्या वेगवेगळ्या तक्रार निवारण प्रणालीवर तक्रारी केल्या जातात.
या तक्रारी सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तक्रारीच्या ठिकाणी पाहाणी करणे अपेक्षित असते. मात्र, त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने तक्रारी तशाच प्रलंबित राहतात. त्यामुळे आता परिमंडळ उपायुक्त व महापालिका सहाय्यक आयुक्त, तसेच सर्व विभागांच्या अभियंत्यांना तक्रारीच्या ठिकाणी स्थळ पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काढले असून, दररोज सकाळी ९.४५ ते ११.४५ या कालावधीत ही पाहणी करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित झाली आहे.
महापौरांनी दिले होते आदेश
काही दिवसांपूर्वी महापौर मंजुषा नागपूरे यांनी पालिका प्रशासनास याबाबत आदेश दिले होते. शहरात सकाळच्या वेळी अधिकाऱ्यांनी प्रभागात फिरल्यास त्यांना पदपथ, रस्ते, अतिक्रमणे, चेंबर, ड्रेनेज अशा समस्यांची माहिती झाल्यास तत्काळ त्या समस्या सोडविता येतील, तसेच नागरिकांना तक्रारी करण्याची वेळ येणार नाही.
त्यामुळे सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर असा उपक्रम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता आयुक्तांनी अधिकाऱ्यांनी सरसकट न जाता ज्या ठिकाणांबाबत दररोज नागरिकांच्या सूचना अथवा तक्रारी येतील, अशा ठिकाणी भेट देऊन त्याचा अहवाल दररोज सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सर्व उपायुक्त, तसेच महापालिका सहय्यक आयुक्तांनी आपला अहवाल संबधित अतिरिक्त आयुक्तांना सादर करायचा आहे. सर्व अभियंत्यांनी आपला अहवाल शहर अभियंत्यांना सादर करायचा आहे.





