PMC News : महापालिकेचा आरोग्य विभागच ‘व्हेंटिलेटर’वर! वर्ग १ च्या १४५ पैकी तब्बल १०७ जागा रिक्त; धक्कादायक वास्तव
PMC News : आरोग्य विभागाची 'धुरा' सांभळणारे अधिकारीच नाहीत; वर्ग १ च्या ७४ टक्के जागा रिक्त असल्याने पालिकेचे नियोजन कोलमडले.

PMC News – पुणे महापालिकेचा जवळपास १५ हजार कोटीची अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर केला. या अर्थसंकल्पात यंदा पुणेकरांना सक्षम आरोग्य सुविधा देण्यासाठी शहरात मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या वर्ग १ च्या अधिकारी व डाॅक्टरांची तब्बल ७४ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे.
त्यामुळे एका बाजूला कोट्यवधीचा निधी मिळाला, तरी नियोजनासाठी अधिकारीच नसल्याने आरोग्य विभाग कसा सक्षम होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहिती अधिकाराअंतर्गत सामाजिक कार्यकर्ते गौरव शिंदे यांनी ही माहिती मागविली होती. त्यानुसार महापालिकेने दिलेल्या माहिती वर्ग १ च्या एकूण मंजूर १४५ पदांपैकी केवळ ३८ पदांवर अधिकारी कार्यरत असून, १०७ महत्त्वाची पदे रिक्त आहेत.
महापालिकेच्या शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना अत्यावश्यक सुविधा मिळत नसल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्यामुळे शिंदे यांनी याबाबत आरोग्य विभागाकडे रिक्त पदांची माहिती मागविली होती. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डाॅक्टरांची संख्या कमी असल्याने नागरिकांना पदरमोड करून खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.
सुपर स्पेशालिटी सेवांना फटका
शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या न्यूरोसर्जन, युरोसर्जन, कार्डिओलॉजिस्ट आणि चेस्ट स्पेशालिस्ट यांसारख्या अति- विशेषोपचार तज्ज्ञांची सर्वच्या सर्व पदे रिक्त आहेत. यामुळे गंभीर आजारांच्या उपचारासाठी रुग्णांना खासगी रुग्णालयांचा महागडा रस्ता धरावा लागत आहे.
प्रशासकीय अनास्था की तांत्रिक अडचण?
एकीकडे शहराचा विस्तार होत असताना आणि आरोग्याच्या नवीन आव्हानांना तोंड देताना, वर्ग १ च्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असणे, ही चिंतेची बाब आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर होत आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांचा मोठा तुटवडा
-विभाग : मंजूर पदे आणि रिक्त पदे
-फिजिशियन : १० मंजूर पदांपैकी एकही पद भरलेले नाही (१० रिक्त).
-बालरोग तज्ज्ञ : १३ पदांपैकी ९ पदे रिक्त आहेत.
-स्त्री रोग तज्ज्ञ : १५ मंजूर पदांपैकी ८ पदे रिक्त आहेत.
-शस्त्रक्रिया तज्ज्ञ : ११ पैकी ८ पदे रिक्त आहेत.
-क्ष-किरण तज्ज्ञ : १७ पैकी १६ पदे रिक्त आहेत.





