प्रभात वृत्तसेवा पुणे – मिळकतकर थकबाकी अभय योजनेच्या पहिल्याच दिवशी महापालिकेच्या तिजोरीत सुमारे १०५३ मिळकतधारकांनी ६ कोटी १५ लाखांची थकबाकी जमा केली. पालिकेकडून १५ जानेवारी २०२६ पर्यंत ही योजना राबविण्यात येणार असून या योजनेची सुरूवात शनिवारपासून करण्यात आली. या कालावधीत ४.८१ लाख मिळकतींना थकबाकी भरण्याची संधी देण्यात येणार आहे, त्यात मिळकतकरावर आकारण्यात आलेल्या दंडावर ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. निवासी, बिगर निवासी तसेच मोकळ्या जागांनाही हा लाभ दिला जाणार आहे. पालिकेच्या मिळकतकर विभागास २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ३ हजार कोटींच्या वसूलीचे उद्दीष्ट देण्यात आले असून आतापर्यंत १७८९ कोटींचा कर वसूल करण्यात आला आहे. पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील कर वसूलीस शासनाने मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगिती दिली आहे. त्यामुळे, पालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यातच, थकबाकीचा आकडा लक्षणीय स्वरूपात वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून अभय योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. थकबाकीदारांसाठी रांगोळ्यांच्या पायघड्या… या योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या थकबाकीदारांच्या स्वागतासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह १५ क्षेत्रीय कार्यालये आणि ५९ नागरी सुविधा केंद्रांवर बोर्ड, बॅनर्स, रांगोळीद्वारे व्यापक प्रचार करण्यात आला. कार्यालये आकर्षक सजवण्यात आली असून, येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे स्वागत विभागीय निरीक्षक आणि पेठ निरीक्षक यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त रवी पवार, सहायक आयुक्त अस्मिता तांबे, सहायक आयुक्त दिपक राऊत आणि सर्व प्रशासन अधिकारी यांनी विविध कार्यालये आणि नागरी सुविधा केंद्रांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. तर जास्तीतजास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे.