PMC News – मार्चअखेरचा फायदा घेत महापालिकेतील छोट्या-छोट्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी अंदाजपत्रकातील निधीतून अल्पावधीत निविदा मंजूर करून, कामे पूर्ण दाखवून ३१ मार्चपूर्वी बिले सादर करून पैसे काढण्याचे प्रकार रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २७ फेब्रुवारी रोजी आदेश काढले होते. त्यानुसार १ मार्चनंतर अशा कोणत्याही कामांच्या निविदा काढू नयेत तसेच कार्यादेश देऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र, अवघ्या १५ दिवसांतच आयुक्तांनी आपलाच आदेश बदलला आहे. नव्या आदेशानुसार प्रशासनाने काढलेल्या निविदांना मंजुरी देऊन अशा कामांना कार्यादेश देण्याची मुभा आयुक्तांनी दिली आहे. मात्र, त्याच वेळी या कामांची बिले ३१ मार्च २०२६ पूर्वी न देता ती पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातून अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, आयुक्तांच्या या निर्णयावर नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याने तसेच प्रशासनावर या कामांसाठी दबाव वाढल्याने आयुक्तांनी हा निर्णय बदलल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. महापालिकेचे २०२५-२६ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपणार असून, १ एप्रिलपासून २०२६-२७ हे नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. दरवर्षी मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर कार्यादेश दिले जातात आणि ३१ मार्चपूर्वी बिले खर्ची टाकण्याची कार्यवाही विविध खात्यांकडून केली जाते. प्रत्यक्षात आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कार्यारंभ आदेश दिल्यानंतर संबंधित कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण करून ती ३१ मार्चपूर्वी खर्ची दाखविणे शक्य होत नाही. अनेकदा कामे न करताच खोटी बिले काढली जातात. तसेच, निधी उपलब्ध नसतानाही कामे प्रस्तावित करून शेवटच्या क्षणी वर्गीकरणाद्वारे निधी मागविण्याचे प्रकार घडतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी आयुक्तांनी १ मार्चनंतर अशा कामांच्या निविदा व कार्यादेश देण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागतही झाले होते. मात्र, आता आयुक्तांनी सुधारित आदेश काढत काही विभागांनी मार्च २०२६पूर्वी काढलेल्या निविदा सध्या मंजुरी प्रक्रियेत असल्याचे नमूद केले आहे. काही निविदांना मान्यताही मिळालेली असल्याने त्या कामांना कार्यादेश देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अशा निविदांना कार्यादेश द्यावेत; मात्र त्यांची बिले पुढील आर्थिक वर्षात सादर करावीत, असे सुधारित आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.