PMC News: पावसाळा तोंडावर अन् पालिकेची ‘ठिगळ’बाजी! पाणी साचणार्या १२० पैकी ३४ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजना
PMC News: पुणे शहरातील २५० पाणी साचणाऱ्या जागांपैकी १२० ठिकाणांवर प्राधान्याने काम; वेळेअभावी ३४ संवेदनशील भागात तात्पुरती ठिगळे लावणार.

PMC News – पाणी तुंबण्याच्या समस्येवर महापालिका अद्यापही पूर्णपणे उपाययोजना करण्यात सफल झाली नाही. त्यामुळे आता पालिका यावर तात्पुरत्या स्वरूपात ठिगळे लावणार आहे. या कामाचा आढावा शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी घेतला असून, आता ऐनवेळी तात्पुरताच उपाय करणे महापालिकेला क्रमप्राप्त झाले आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना शहरातील संभाव्य पूरपरिस्थिती आणि ठिकठिकाणी पाणी साठण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत.
पावसकर यांनी नुकतीच पावसाळापूर्व कामांचा आढावा बैठक घेतली. या बैठकीत मलनिःस्सारण विभाग, पथ विभाग, सर्व परिमंडळचे उपायुक्त तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. शहरातील पाणी साचणार्या सुमारे २५० ठिकाणांपैकी १२० ठिकाणांवर प्राधान्याने उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले होते. यापैकी ४४ कामे पूर्ण झाली असून, ४२ कामे सुरू आहेत. उर्वरित ३४ ठिकाणी मोठ्या स्वरूपाच्या उपाययोजनांची आवश्यकता आहे.
ही कामे पूर्ण होण्यासाठी अधिक कालावधी लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार पथ विभागामार्फत १५ कामे, क्षेत्रीय कार्यालयांकडून आठ कामे आणि मलनिःस्सारण विभागाकडून ११ कामे पुढील दोन आठवड्यांत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. महापालिका आयुक्तांच्या एक ऑक्टोबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार ड्रेनेज लाईनच्या कामांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.
त्यानुसार ६०० मिलीमीटर व्यासापर्यंतच्या वाहिन्यांची दुरुस्ती आणि साफसफाई क्षेत्रीय कार्यालय स्तरावर, तर त्यापेक्षा मोठ्या वाहिन्यांची जबाबदारी मुख्य मलनिःस्सारण विभागाकडे सोपवण्यात आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर व्हेईकल डेपोमधील जेटिंग मशिन, जेटिंग कम सक्शन मशिन, ग्रॅब मशिन आणि चॅम्पियन मशिनचा वापर करून बंद झालेल्या वाहिन्या तातडीने मोकळ्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, चेंबर आणि मलवाहिन्यांमधील गाळ काढण्यावर प्राधान्याने लक्ष देण्यात येणार आहे.
रात्रपाळीत पथकांची नियुक्ती
रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस आल्यास पावसाच्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी पथ विभागाच्या रोड मेंटेनन्स व्हॅनचा क्षेत्रीय कार्यालयांशी समन्वय साधून वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रात्रपाळीत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर किमान पाच कामगार उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर किंवा खासगी जागांवर पाणी साचणार्या ठिकाणी आवश्यक पंप उपलब्ध करून देण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालय आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने समन्वयाने पार पाडावी, असे आदेश दिले आहेत.
२४ तास तक्रार निवारण यंत्रणा
पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्तरावर २४ तास तक्रार निवारण केंद्र सुरू राहणार आहे. रात्रपाळीसाठी आपत्ती व्यवस्थापन, बांधकाम, मलनिस्सारण आणि अतिक्रमण विभागातील उपअभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्याचा दूरध्वनी क्रमांक नागरिकांसाठी प्रसिद्ध केला जाणार आहे.





