PMC News : महापालिकेची मोठी ऑफर! वनमहोत्सवात अवघ्या ५ रुपयांत मिळणार विविध वृक्षरोपे
PMC News : वृक्षप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांसाठी मोठी संधी; १ ते दीड वर्षे वयाची रोपे केवळ पाच रुपये प्रतिरोप दराने उपलब्ध.

PMC News – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्या उद्यान विभागाकडून छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वनमहोत्सवात स्थानिक जातींची एक ते दीड वर्षे वयाची विविध रोपे पाच रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने सुरू केलेल्या हरित पुणे,
समृद्ध पुणे मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीराजे उद्यानात पाच जून ते १४ ऑगस्ट या काळात वनमहोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात अल्पदरात रोप विक्री, वृक्षारोपण तसेच बीज संकलन केंद्र आदींचा समावेश आहे. या महोत्सवाचे उद्घाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
या वेळी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मुख्य समन्वयक आणि विश्वस्त मकरंद टिल्लू, ॲड. राजेंद्र आगरवाल, महापालिकेचे उद्यान विभागप्रमुख डॉ. अशोक घोरपडे, मुख्य अभियंता राजेश बनकर, उद्यान अधीक्षक संतोषकुमार कांबळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. वनमहोत्सवात नागरिक, वृक्षप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांना स्थानिक जातींची एक ते दीड वर्षे वयाची रोपे केवळ पाच रुपये प्रतिरोप या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,
तसेच नागरिकांनी त्यांच्या परिसरातील वृक्ष आणि फळझाडांच्या बिया बीज संकलन केंद्रात जमा करून रोपनिर्मिती उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याच कालावधीत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत तयार करण्यात आलेले सेंद्रिय खतही उपलब्ध करून देण्यात आले आहे.




