PMC News : गुरुवारच्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर, अशा घटनांना आळा घालण्यासाठी नदी-नाल्यांलगतच्या अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून आवश्यक बांधकामे तातडीने हटविणार असल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पालिका आयुक्त नवल किशोर राम यावेळी उपस्थित होते. अवकाळीने शहराला झोडपल्यानंतर पूरस्थिती, झाडपडीच्या घटना तसेच नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी महापौरांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत ही दिली. पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे पंचनामे करून त्याबाबत जिल्हा प्रशासनास कळविण्यात येणार आहे. तसेच शासनाकडून मदत न मिळाल्यास पालिकेच्या माध्यमातून मदत देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, रस्ते विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, प्रकल्प विभाग प्रमुख जगदीश खानोरे, उपायुक्त माधव जगताप यावेळी उपस्थित होते. पावसाळी कामे सोमवारपासून पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, चेंबर सफाई तसेच पावसाळी वाहिन्यांच्या स्वच्छतेची कामे येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया परिमंडळ उपायुक्तांकडून सुरू झाली असून, त्यानुसार कमी दराच्या निविदा सादर करणाऱ्या ठेकेदारांना थेट काम करण्याच्या सूचना दिल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. अवकाळी पाऊस, पुणे तसेच १५ मेपर्यंत ही कामे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जाणार असून, पुढील महिनाभर सर्व क्षेत्रीय कार्यालयांची पथके तसेच अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामांचा नियमित आढावा घेतील. याशिवाय पावसाळी वाहिन्यांची क्षमता वाढविण्यासाठी अंदाजपत्रकात निधी वाढवून देण्याचे नियोजन असल्याचे आयुक्तांनी सांगितले. १२१ ठिकाणी तातडीची कामे शहरात पावसाळ्यात २४० ठिकाणी पाणी साचते. त्यापैकी २२७ ठिकाणी गुरुवारच्या अवकाळीने पाणी साचले होते. या ठिकाणांपैकी ४९ ठिकाणी अवघ्या १० ते १२ मिनिटांत पाण्याचा निचरा करण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, १२१ ठिकाणी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याने या भागांत सोमवारपासून कामे सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यात प्रामुख्याने पाण्याचा निचरा सुधारण्यासाठीच्या उपायांचा समावेश असेल. पालिका देणार मदत गुरुवारी नवशा मारुती मंदिराजवळ झाड कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले. या घटनांचे पंचनामे करून मृत महिलेच्या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून मिळणारी मदत पाच लाख रुपये असून, पालिका दोन लाखांची मदत देणार आहे. तसेच शासनाकडून मदत न मिळाल्यास पालिका पाच लाखांची मदत देणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.