PMC News – एनडीए चौक (चांदणी चौक) ते भूगाव रस्ता रूंदीकरणासाठी तयार कलेल्या २०३ कोटींच्या महत्त्वाकांक्षी वाहतूक आराखड्याला महापालिका स्थायी समितीने तूर्त स्थगिती देत फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आराखड्यासाठी ७२ (ब) कलमानुसार एवढी मोठी आर्थिक तरतूद करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत नवा सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे म्हटले आहे. याविषयी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी माहिती दिली. चांदणी चौकापासून भूगावकडे जाताना दोन किमीपर्यंत पालिकेची हद्द आहे. मुळशीकडून कोकणात जाणारी वाहने याच मार्गाने जातात. तसेच पिरंगुट औद्योगिक वसाहत तसेच भूगाव, भुकूम आणि इतर गावातील वाहतूक याच मार्गवरून होते. पालिकेने पूर्वी येथील रस्त्याचे रुंदीकरण केले असले तरी वाढत्या वाहनसंख्येमुळे हा रस्ता कमी पडत आहे. त्यामुळे सकाळ-सायंकाळी येथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे. भविष्याचा विचार करत पालिकेने विकास आराखड्यात (डीपी) हा रस्ता ६० मीटर रुंदीचा दर्शवला आहे. भूगाव रस्त्यावरील पालिकेची हद्द संपल्यानंतर येथे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) रिंगरोड प्रस्तवित आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे चांदणी चौकातून भूगाववकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून येथे उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. पुणे महापालिका पालिकेच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या कामासाठी १६ कोटींची तरतूद केली आहे. प्रस्तावानुसार पहिल्या टप्प्यात ६७.८५ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात १३५.७६ कोटींची कामे हाती घेण्यात येणार होती. प्रत्यक्षात केवळ १० मीटर रुंदी असलेल्या रस्त्याची नियमानुसार रुंदी ६० मीटर असणे अपेक्षित आहे. त्यासाठी बाकीची जमीन पालिकेच्या ताब्यातच नाही. येथे सातत्याने होणारी कोंडी फोडण्यासाठी मुख्य चौकांमध्ये उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर उभारण्याचे नियोजन केले होते. पीव्हीपीआयटी महाविद्यालय चौकात २७ कोटी खर्चून ४३० मीटर लांबीचा ग्रेड सेपरेटर उभारण्याचा प्रस्ताव होता. तसेच, ॲम्ब्रोशिया आणि पाटीलनगर चौकात ८२ कोटी खर्चाचा ८७० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन होते. याशिवाय राम नदीवर ३० मीटर लांबीचा आणि ७० मीटर रुंदीचा पूल उभारण्याचेही प्रस्तावात नमूद होते. मात्र या विषयाचा नीट अभ्यास करून हा प्रस्तावच पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले आहेत.