PMC News – मिळकतकराचा धनादेश बाउन्स झाल्यास महापालिका थेट मिळकतकरधारकावर खटले दाखल करणार आहे. एवढेच नव्हे, यापुढे थकबाकीदारांना केवळ नोटिसा न देता मिळकतींवर बोजा चढवला जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते आस्थापना, मोठ्या कंपन्या, सरकारी कार्यालये अनेकांचे मिळकतकर थकीत आहे. ही रक्कम काही शेकडा कोटी रुपयांपर्यंत आहे. आकारणी आणि कर संकलन कार्यालयामार्फत प्रतिवर्षी मिळकतकर देयकांचे वाटप करण्यात येते. त्याअनुषंगाने जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात, तसेच मुख्य इमारत पुणे महापालिका येथील नागरी सुविधा केंद्रात धनादेशाद्वारे मिळकतकर भरणा नागरिक करतात. मात्र, अनेकांचे धनादेश बाउन्स होतात. त्यांची संख्याही हजारांवर आहे. सन २०२५-२६ या एकाच वर्षांत ८९.२ कोटी रुपयांचे सुमारे ४ हजार २०१ धनादेश बाउन्स झाले आहेत. त्यांना नोटिसा देऊन महापालिकेच्या कर आकारणी-कर संकलन विभागाने वसुली करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील ३ हजार ३३० जणांनी पैसे भरले असून, अद्याप ८७१ जणांनी पैसे भरलेले नाहीत. ही रक्कमही तब्बल ३२.३ कोटी रुपये असल्याने ही कारवाई प्रस्तावित केली आहे. १ एप्रिल २०२५ पासून अनेक नागरिकांनी मिळकतकराचा धनादेशाद्वारे भरणा केला आहे. तथापि, सदर भरणा करताना धनादेशातील त्रुटीमुळे, तसेच नागरिकांच्या बँक खात्यात असलेल्या अपुऱ्या शिलकीमुळे, तसेच इतर तांत्रिक अडचणीमुळे धनादेश वटले नाहीत. अशा मिळकतधारकांना नोटीस बजावल्या आहेत; परंतु सदर मिळकतधारकांनी अद्याप भरणा केलेला नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याने ही कारवाई करण्यात येणार आहे. ज्यांचे चेक बाउन्स झाले आहेत, अशा एकाही मिळकतधारकांवर सन २०२२ पासून खटले दाखल केले नाहीत. त्यामुळेच ही संख्या चार हजारांवर गेली आहे. आता धनादेश बाउन्स झाला, तर आठवडाभरातच खटले दाखल केले जातील. तरीही थकबाकी भरली नाही, तर मिळकतींवर बोजा चढविला जाईल. – रवी पवार, उपायुक्त पुणे महापालिका