PMC News: थेट सरसंघचालकांना पत्र! अरविंद शिंदेंच्या लेटर बॉम्बने भाजपमध्ये खळबळ…काय आहे पत्रात?
PMC News: 'देवाभाऊंचा निरोप' सांगून निर्णय घेतले जात असल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण.

PMC News – महापालिकेतील कचरा निविदांच्या प्रकरणावरून काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांना पत्र लिहिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार किंवा महापालिकेऐवजी थेट संघ नेतृत्वालाच साकडे घालत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
विशेष म्हणजे, या पत्रात भ्रष्टाचाराच्या आरोपांबरोबरच भाजपमधील अंतर्गत सत्तासंघर्ष आणि काही नेत्यांच्या भूमिकांवरही थेट भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पत्रात भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सभागृह नेते गणेश बिडकर, महापौर मंजुषा नागपूरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यावरही अप्रत्यक्ष आणि थेट टीका केली असून सर्वच जण मौन बाळगत असल्याचा आरोप केला आहे.
तसेच, शहरातील ननगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या ३० कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला, मात्र त्याचवेळी शेकडो कोटींच्या निविदा प्रक्रियेत वेगळी भूमिका घेण्यात आल्याचा दावा करत भाजपमधील अंतर्गत मतभेदांवरही शिंदे यांनी बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांना पुण्यातील निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा असल्याचा उल्लेखही पत्रात केला आहे.
देवाभाऊचा संदर्भ कोणाकडे
महापालिकेच्या निविदांवरून हे पत्र पाठविण्यात आले असले तरी या पत्राची खरी राजकीय चर्चा त्यातील राजकीय संदेशांमुळे सुरू झाली आहे. मुंबईतील देवाभाऊंचा निरोप आहे या नावाखाली महापालिकेत निर्णय घेतले जात असल्याचा उल्लेख करत शिंदे यांनी हे वाक्य भ्रष्टाचाराचे कोडवर्ड बनल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या देवाभाऊचा नेमका संदर्भ कोणाकडे आहे, याची चर्चा सुरू आहे.





