PMC elections : महापालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीला उशीर ; दिवाळीपूर्वी सोडत जाहीर होण्याची शक्यता

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आरक्षित प्रभाग कोणते हे निश्चित करण्यासाठी सोडत काढण्याची तयारी सुरू होती. या सोडतीसाठी १० ऑक्टोबर ही संभाव्य तारीख सांगितली जात होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप आदेश न आल्याने हा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे आता दिवाळीपूर्वी सोडत निघण्याची शक्यता आहे.या सोडतीत अनुसूचित जमातींसाठी दोन, अनुसूचित जातींसाठी २२ प्रभाग आरक्षित राहतील.
तर, महिलांसाठी ५० टक्के आरक्षणानुसार एकूण ८३ जागा महिलांसाठी राखीव असतील. ही आरक्षण सोडत १० ऑक्टोबर रोजी काढण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले होते. मात्र, त्यास निवडणूक आयोगाची मान्यता न मिळाल्याने ही सोडत पुढे गेली आहे.महापालिकेच्या आगामी निवडणुकीत एकूण १६५ नगरसेवक निवडले जाणार असून त्यासाठी ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण ५ हजार ९२२ हरकती-सूचना प्राप्त झाल्या होत्या.
त्यापैकी १ हजार ३२९ हरकती मान्य, तर ६९ हरकती अंशतः मान्य करण्यात आल्या आहेत. उर्वरित ४ हजार ५२४ हरकती नामंजूर करण्यात आल्या आहेत. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय (ओबीसी) तसेच महिलांसाठीचे आरक्षण निश्चित करणे आवश्यक आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार निवडणूक लढवणार हे स्पष्ट होणार आहे.





