प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी ५० जागा देण्याचा फाॅर्म्युला ठरला आहे. बाकीच्या पंधरा जागा आघाडीतील अन्य पक्षांना दिल्या जातील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत थेट सहभागी होणार नाही. मात्र, शिवसेनेच्या कोट्यातून मनसेला उमेदवारी देण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. वरील सूत्रानंतर आता महाविकास आघाडीत प्रभाग निहाय चर्चा सुरू झाली आहे.महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. मात्र, राष्ट्रवादीने दिलेल्या कमी जागा आणि घड्याळ निवडणूक चिन्हाचा धरलेला आग्रह यामुळे दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे शिवसेना तसेच राशपची बैठक स्टेशन जवळील एका हाॅटेलात पार पडली. या बैठकीत चर्चेसाठी कमी वेळ असल्याने तिन्ही पक्षांनी कोणाचे किती नगरसेवक आले यावर चर्चा करण्याऐवजी प्रत्येकी ५०-५०-५० जागा लढवाव्यात आणि उर्वरीत १५ जागा आघाडीत येण्यासाठी तयार असलेल्या समविचारी पक्षांना द्याव्यात, असा फाॅर्म्युला निश्चित करण्यात आला. मनसेला आघाडीत प्रवेश देण्याऐवजी शिवसेनेने आपल्या कोट्यातून मनसेला जागा द्याव्या असे ठरविले. ठाकरे गटाची काॅग्रेसवर नाराजी या बैठकीत जागा वाटपचा आकडा निश्चित झाल्यानंतर काॅग्रेस आणि शिवसेनेत प्रत्येक प्र्भागतील जागेवरून चर्चा झाली. त्यात चर्चा झालेल्या पहिल्या ५० जागांच्या चर्चेत काँग्रेसने तब्बल ४० जागांवर दावा केला. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला केवळ ६ च जागा वाट्याला येत असल्याने शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे तसेच वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी आमच्याकडेही सक्षम उमेदवार असताना सगळया जागा काॅग्रेसला देण्यास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत बैठकीतून निघून जाण्याची भूमिका घेतली. त्यामुळे बैठकीत काही वेळ तणावाचे वातावरण निर्मण झाले होते. काॅग्रेसचा खुल्या जागांवर डोळा या बैठकीत झालेल्या चर्चेत काँग्रेसने प्रामुख्याने एस.सी आरक्षण असलेल्या आणि खुले आरक्षण असलेल्या जागांवर दावा केल्याचे शिवसेना ठाकरे गट तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. भाजपमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच आहे. त्यामुळे भाजपकडून तिकिट न मिळाल्यास काय, याची चिंता असलेल्या अनेकांकडून काॅग्रेसकडे विचारणा केली जात आहे. त्यामुळे या बैठकीत चर्चेवेळी काँग्रेसन प्रत्येक प्रभागातील खुल्या गटासह एससी जागांची मागणी करत असल्याचे बैठकीस उपस्थित असलेल्या पक्षांकडून सांगण्यात आले.