PMC Election : लोहियानगरमधील प्रश्न मार्गी लावणार; रमेश बागवेंचे आश्वासन

पुणे : लोहियानगर येथील एसआरए प्रकल्पाच्या समस्या सोडविण्यात गेल्या आठ वर्षांपासून पालिकेतील सत्ताधारी भाजपला अपयश आले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. हा प्रकल्प नागरिकांच्या फसवणुकीचा ठरल्याची टीका माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केली. हा भकासपणा दूर करायचा असेल, तर येत्या पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रभाग क्रमांक २२ मधील काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफीक शेख आणि दिलशाद शेख, जुबेरबाबू शेख, यासेर बागवे, चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, मुन्नाभाई शेख, रोपभाई शेख, आरीफ शेख, विठ्ठल थोरात, दयानंद अडागळे, शफीक शेख, मारुती कसबे, राजू बरगुडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बागवे म्हणाले, लोहियानगर हा संपूर्ण झोपडपट्टीचा भाग असून, येथे अस्वच्छता, पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या प्रभागात काँग्रेस पक्षाला संधी देण्याची गरज आहे. या परिसरात सर्व जाती व धर्मांचे नागरिक वास्तव्यास असून, येथे सर्वधर्मसमभावाच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे. संपूर्ण लोहियानगर वसाहतीत काढलेल्या पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी मुक्त संवाद साधला. पदयात्रेला नागरिकांसह महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.




