प्रभात वृत्तसेवा पुणे – दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असतील, तर ते घड्याळाच्या चिन्हावरच लढणार ही अट अजित पवार यांनी मागे घेतल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; परंतु स्वत:च्या पक्षाच्या चिन्हावरच, असे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.वेगवेगळ्या शहरात त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार वेगवेगळी समीकरणे आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना एकमेकांचे पटत नाही, असे अनेकदा माध्यमांनी दाखवले आहे; परंतु नाशिकमध्ये ते दोघे एकत्र आले आहेत. तेथे कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले आहे, तसे मत लक्षात घेऊनच लढावे लागते. प्रत्येक शहरत वेगळे समीकरण पाहायला मिळेल, असे पवार म्हणाले. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असून, उद्या (दि. ३० डिसें.) दुपारपर्यंत जागांचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले जातील. कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेतून दोन्ही पक्षांचे उमेदवार आपापल्या चिन्हावर लढतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. सध्या महापालिका निवडणुकीचा विषय आहे. दोन्ही पक्ष विलीनीकरणाचा विषय असता, तर संपूर्ण महाराष्ट्रात असता. येथे फक्त पुणे आणि पिंपरी- चिंचवड येथील जागांबाबत घेतलेला हा निर्णय आहे. याआधी महापालिका निवडणुकांमध्ये मोठे नेते कधी सहभागी झाले नव्हते; परंतु पक्षाचे प्रमुख शरद पवारांना ती पूर्वीपासून सवय असल्याने त्यांनी जे लोक आपल्यासाठी लढले, त्यांचे मत जाणून घ्या. त्यांना विश्वासात घ्या, ते जे म्हणतील, त्याप्रमाणे त्या- त्या ठिकाणी निर्णय घ्या, असे सांगितले आहे. त्याचबरोबर हा निर्णय या दोन दिवसांत झालेला नाही, तर गेले अनेक दिवस यावर चर्चा सुरू आहे. प्रत्येक महापालिकेचे प्रश्न वेगळे आहेत. लोकांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.