प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिका निवडणूक तोंडावर आली असून, निवडणुकीसाठी महापालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, काही कर्मचारी कामकाजात हलगर्जीपणा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता निवडणूक संपेपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याला रजा किंवा सुट्टी मिळणार नाही, असे आदेश निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी जारी केले आहेत. तर, अपवादात्मक परस्थितीत पूर्व परवानगीनेच रजा दिल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे कामकाज सुरू आहे. सध्या, प्रभाग रचनेची कार्यवाही पूर्ण झाली असून प्रारूप मतदार याद्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निवडणूक विषयक इतर सर्व कामे कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक आहे.या पार्श्वभूमीवर काही अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या जबाबदारीवर असतानाही रजा घेत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे निवडणूक कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त असणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची रजा किंवा सुट्टी ही निवडणूक कार्यालयाची पूर्वपरवानगीशिवाय मंजूर करू नये, असे आदेशात नमूद आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि.) यांच्या आदेशावरून हे निर्देश जारी करण्यात आले असून निवडणूक कामकाज निर्विघ्न पार पडावे यासाठी प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.