Pmc Election : सगळे मिळून आदर्श प्रभाग घडवूया; सनी निम्हण यांचा लोकाभिमुख उपक्रम

पुणे : लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि शाश्वत विकास या तत्त्वावर प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी सनी निम्हण यांचा विकासासाठी ‘सूचना देऊया, सगळे मिळून आदर्श प्रभाग घडवूया’ या उपक्रमास औंध- बोपोडी भागातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
शेकडो नागरिकांनी क्यू आर कोड स्कॅन करून, गुगल अर्ज भरून प्रभागाच्या विकासासाठी थेट संपर्क साधून आपल्या सूचना मांडल्या असून, त्याचा समावेश वचननाम्यात केला जाणार आहे. प्रभाग क्रमांक ८ औंध- बोपोडीचे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निम्हण निवडणूक लढवत आहेत.
निवडणुकीच्या आधीपासूनच निम्हण यांनी प्रभागात आठ ठिकाणी नागरिकांसाठी सूचना केंद्रे सुरू केली होती. या केंद्रावर आलेल्या सूचना, तक्रारींचा अभ्यास करून त्या वचननाम्यात समाविष्ट करणार असून, पुढे हाच वचननामा प्रत्यक्षात विकासनामा ठरेल, असा विश्वास निम्हण यांनी याबाबत बोलताना व्यक्त केला.
या उपक्रमासाठी निम्हण स्वतः प्रभागातील सोसायट्या, वस्ती विभागात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ पद नाही, तर जनतेच्या विश्वासाची जबाबदारी असते. नागरिकांचे प्रश्न समजून घेणे, त्यावर ठोस उपाययोजना करणे आणि लोकांशी थेट संवाद साधणे हे मतदारांच्या पसंतीस उतरत असून, निम्हण यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





