PMC Election: भाजपसह सर्वच पक्षात ‘अंतर्गत वार’! नाराज इच्छुकांचा असहकार, उमेदवार पडले एकाकी

प्रभात वृत्तसेवा
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षात उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस होती.उमेदवारी मिळाली नाही तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत नाराजी जाहीर केली. त्यानंतर पक्षाकडून या नाराजांना स्विकृत सदस्य, पक्षीय समित्या तसेच वेगवेगळया शासकीय समित्यांची आश्वासने देत अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले आहे. मात्र, त्यानंतर हे नाराज पक्ष उमेदवारच्या प्रचारातून गायब आहेत.
उमेदवारीसाठी पात्र असताना डावलेले गेल्याने या इच्छुकांना भेटण्यास पक्षाचे आमदार तसेच नेते भेटत असले तरी हे नाराज प्रचारात उतरण्यास तयार नाहीत. त्यामुळे नवीन उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांना प्रचाराचा अनुभव नसल्याने त्यांची चांगलीच कोंडी होत आहे. नवीन उमेदवारांना कार्यकर्ते मिळविणेही अडचणीचे ठरत आहे.नाराजी कायम ?भाजपसह सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांची नाराजी अद्यापही राजकीय पक्षांना दूर करता आलेली नाही. त्यामुळे हे नाराज केवळ प्रचाराच्या वेळी तोंड दाखविण्यापुरते समोर येत आहे.
नाराजी दूर करण्य़ासाठी नेते भेट देवून गेले असले तरी उमेदवारांकडून भेटीसाठी वेळ मागण्यात आल्यानंतरही हे नाराज त्यांना भेटण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे मध्यस्थांच्या माध्यमातून संपर्क साधला जात आहे. अनेक नवीन उमेदवारांना अचानक उमेदवारी मिळालेली आहे. काही उमेदवारांनी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रभागात काम सुरू केल्याने अनेकांना हद्दीही माहिती नाहीत.
पक्षाचे वर्षानुवर्षे कार्यकर्ते राहिलेले आणि माजी नगरसेवकांच्या प्रचारात अग्रेसर असलेल्या इच्छुकांना निवडणूक यंत्रणा आणि प्रभागांची इत्यंभूत माहिती आहे. अशा स्थितीत त्यांची भूमिका महत्वाची ठरते. मात्र, ही नाराजी कायम असल्याने त्यांच्याकडून उमेदवारांना सहकार्य होत नसल्याचे वास्तव आहे.
मतदारांमध्येही नाराजी
भाजपसह सर्वच राजकीय पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या आठ वर्षांपासून महापालिका निवडणुकीसाठी तयारी केलेली आहे. २०१७ नंतर दोन विधानसभा निवडणूका झाल्या. त्यामुळे यातील अनेक जण विधानसभेच्या अनुषंगानेच काम करत होते. त्यामुळे त्यांनी पक्षाकडे आमदारकीसाठी उमेदवारी मागितलेली होती.
परिणामी, ही बाब लक्षात घेत पक्षाकडून विधानसभेच्या निवडणुकीत अडचण निर्माण केलेल्या कार्यकत्यांचे तिकिट कापत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. मात्र, त्यानंतरही अनेक इच्छुकांचा मतदारांमध्ये चांगला प्रभाग आहे. अशा ठिकाणी मतदारही नवीन उमेदवारांना अपेक्षित प्रतिसाद न देता उमेदवारांच्या समोरच आपल्या भागातील कार्यकर्त्यांचे गुणगाण करत आहेत.



