प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत येत्या मंगळवारी (दि. ११ नोव्हेंबर) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे जाहीर होणार आहे.सोडतीनंतर नागरिक, राजकीय पक्षांना १७ ते २४ नोव्हेंबरमध्ये हरकती आणि सूचना नोंदविता येतील. अंतिम आरक्षण सोडत २ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.आरक्षण सोडतीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, विशेषतः काही प्रभागांच्या सीमांकनातील बदल आणि आरक्षणातील फेरबदलांमुळे अनेक इच्छुकांची उत्सुकता वाढली आहे. निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, महापालिकेतील एकूण नगरसेवकांची संख्या १६५ असून, शहरात ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय तर आंबेगाव-कात्रज हा एकमेव पाच सदस्यीय प्रभाग आहे. निवडणूक आयोगाच्या आरक्षण निकषांनुसार एकूण ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यामुळे ८३ नगरसेविका आणि ८२ नगरसेवक असे प्रमाण राहणार आहे. तसेच अनुसूचित जातींसाठी (एससी) २२, अनुसूचित जमातींसाठी (एसटी) २, आणि इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) ४४ जागा आरक्षित आहेत. उर्वरित जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या असतील. आरक्षण सोडतीनंतर प्रारूप आरक्षणाचा तपशील १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत नागरिक, संघटना आणि राजकीय पक्षांना आरक्षणाबाबत हरकती व सूचना नोंदविता येईल. हरकती व सूचना महापालिका मुख्यालय, निवडणूक विभागाचे कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयात प्रत्यक्ष नोंदविता येतील. वेबसाईट, ईमेल किंवा ऑनलाईन माध्यमातून प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील. त्यानंतर सर्व हरकतींची सुनावणी करून २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत प्रसिद्ध होईल. या सोडतीनंतर निवडणूक कार्यक्रमाची पुढील प्रक्रिया निश्चित होईल.