PMC Election : भाजप सत्तेत असूनही विकास नाही – रमेश बागवे
पुणे : भाजप केंद्र व राज्यात सत्तेत असूनही सर्वसामान्यांची फसवणूक, गुन्हेगारी आणि जातीयवाद वाढत असल्याने पुण्यासारखे विद्येचे माहेरघरही असुरक्षित झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करणे आवश्यक आहे, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी लोहियानगर येथील प्रचार सभेत केले.
काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. या वेळी इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफिक शेख आणि दिलशाद शेख उपस्थित होते. बागवे म्हणाले, की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि व्याजाच्या व्यवसायाशी संबंधित उमेदवारांना पुढे केले जात आहे. त्यांनी जातीयवादाच्या आधारे जनतेची दिशाभूल होत आहे. महापालिकेची तिजोरी रिकामी करून विकासाचे खोटे दावे केले जात असून, केंद्र व राज्यात सत्ता असतानाही नागरिकांच्या जीवनात कोणताही ठोस बदल झालेला नाही.
काँग्रेसचे विचार फुले- शाहू- आंबेडकरांचे असून, गोरगरीब, कष्टकरी आणि झोपडपट्टीतील नागरिकांपर्यंत विकास पोहोचवणे हाच काँग्रेसचा आत्मा आहे. पाणी, वीज, पक्की घरे आणि मूलभूत सुविधा देण्याचे काम काँग्रेसच पूर्ण करू शकते, असा विश्वास बागवे यांनी या वेळी व्यक्त केला. वेळी जुबेर शेख, मधुकर चांदणे, बाळू कसबे, पप्पू माने, राजू भरगुडे, मारुती जाधव, इम्तियाज शेख, इमरान शेख, सूरज माने, नवाज शेख, सलीम सय्यद, काळूराम हांडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





