PMC Election: भाजपची ‘महायुती’तून लढण्याची इच्छा, पण निर्णय कोणाच्या हाती? मोहोळांनी व्यक्त केला संभ्रम

प्रभात वृत्तसेवा
पुणे – आमची मागणी महायुतीतूनच लढण्याची; परंतु प्रदेशातील पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे माहीत नाही, असा संभ्रमाचा सूर भाजपच्या रविवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतून मांडण्यात आला.आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपची कोअर कमिटीची बैठक रविवारी पुण्यात झाली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, मंत्री चंद्रकांत पाटील,
शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, समन्वयक मकरंद देशपांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार, विविध संघटनांचे अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आगामी निवडणूक ही मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय या बैठक घेण्यात आला. त्यानंतर मोहोळ आणि पाटील यांनी या बैठकीविषयी पत्रकारांना माहिती दिली.
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी आणि सूचना देण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये विविध कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत, तसेच मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल, अशी माहिती या वेळी पाटील यांनी दिली.बारा महिने काम करणारी आमची संघटना आहे.
मोठ्या निवडणुकीला सामोरे जाताना एक प्रक्रियेचा भाग म्हणून आजची बैठक घेतली. नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवला होता; परंतु महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याची आमची मागणी आहे.
मात्र, प्रदेश पातळीवर काय निर्णय होईल, हे आता माहिती नाही, असे मोहोळ यांनी नमूद केले.मतदार यादीतील चुका सुधारल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेला चुका होत्या. आम्ही रडत बसलो नाही. याद्या दुरुस्त झाल्या पाहिजे, हीच आमची भूमिका, असेही मोहोळ म्हणाले.
आजपासून अर्ज वाटप आणि स्वीकृती
इच्छुकांना आजपासून (दि. ८) अर्ज वाटप आणि स्वीकृती करण्यात येणार आहे. यासाठी दोनच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सोमवार आणि मंगळवारी पक्षाच्या शहर कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर हे अर्ज प्रदेशाकडे दिले जातील. तेथे चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले





