PMC Action : महापालिकेचा ‘बुलडोझर’ सुसाट! लोहगाव-वाघोलीत बड्या हॉटेल्सवर कारवाई; नागरिकांचा संताप का?
PMC Action : महापालिकेच्या कारवाईवरून स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर; प्रशासनावर लावला गंभीर आरोप.

PMC Action : महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार लोहगाव ते वाघोली तसेच विमान नगर, निको गार्डन परिसरातील एका हॉटेलवर बुधवारी सकाळी बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई केल्याची माहिती पालिकेच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी दिली. मात्र, या कारवाईवरून स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून काही ठराविक बांधकामांवरच कारवाई केल्याचा आरोप केला आहे.
या कारवाईत मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. रमेश शेलार यांच्यासह महापालिकेचे २० पोलीस, एमएसएफ जवान ७०, जेसीबी १५, गॅसकटर १५, ब्रेकर १५ यांचा वापर केला. या कारवाईसाठी ३० सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, १५ अतिक्रमण निरीक्षकआणि २०० बिगारी सेवकांची मदत घेतली.
कारवाईदरम्यान सौरभ खरात, कोकाटे, संग्राम पवार (कनिष्ठ अभियंता), अभिषेक कुसाळकर (कनिष्ठ अभियंता, बांधकाम विकास विभाग), इरफान शेख (उपअभियंता, बांधकाम विभाग) उपस्थित होते. कारवाई केलेला भाग आता महापालिकेच्या हद्दीत आलेला असला तरी मागील दोन आठवड्यांपूर्वी या भागातील बांधकाम परवानगी तसेच नियोजनाचे अधिकार पीएमआरडीएकडे होते.
हे अधिकार आता महापालिकेकडे आले असले तरी अद्याप पालिकेने त्यांच्याकडून कागदपत्रे घेतलेली नाही. तसेच अनेकांनी त्यांच्याकडे परवानगीसाठी अर्ज केलेला आहे. असे असतानाही महापालिकेने चुकीच्या पध्दतीने कारवाई केल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. या कारवाईवेळी अनेक नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधत कारवाई थांबविण्याची मागणी केली. मात्र, नगरसेवकांनाही याची काहीच माहिती नसल्याने त्यांनाही यावर काही बोलता आले नाही.
ग्राहकांना बाहेर काढून हॉटेलवर कारवाई
या कारवाईपूर्वी महापालिकेने १८ बांधकामांना नोटीस दिली होती. त्यात व्हीआयपी या हाॅटेलचाही समावेश होता. पालिकेचे पथक कारवाईसाठी गेल्यावर या हाॅटेलमध्ये ग्राहक बसलेले होते. या ग्राहकांना बाहेर काढत महापालिकेने हाॅटेलचे अनधिकृत बांधकाम काढून टाकले.





