PMC Abhay Yojana – महापालिका प्रशासनाकडून १५ नोव्हेंबर २०२५ पासून अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत मिळकत कर भरण्यासाठी थकबाकीदारांना अखेरचे दोन दिवस उरले आहेत. या योजनेची मुदत १५ मार्चला संपत असून जास्तीत जास्त थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत शहरातील १ लाख ७६ हजार ३३५ मिळकतींची १००५ कोटी रुपयांची थकबाकी भरण्यात आली आहे. प्रशासनाकडून ही योजना १५ जानेवारी २०२६ पर्यंतच प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु, महापालिकेस अपेक्षीत उत्पन्न न मिळाल्याने आयुक्तांनी १५ फेब्रुवारीपर्यंत या योजनेस मुदतवाढ दिली होती. त्यानंतर पालिकेत नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार स्थायी समितीने या योजनेस १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता, पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नसल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कर संकलन विभागाचे उपायुक्त रवी पवार यांनी केले आहे. दरम्यान, स्थायी समिती बैठक होणार असून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुट्टीच्या दिवशीही कर भरता येणार… अभय योजनेची मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी शासकीय सुट्टी येत असल्याने, महापालिकेकडून शनिवार ( १४ मार्च ) आणि रविवार (१५ मार्च) या दोन्ही दिवशी महापालिकेची शहरातील सर्व करभरणा केंद्र सुरू ठेवली जाणार आहेत. या केंद्रासाठी जादाचे कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त थकबाकीदारानी कर भरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.