भाजप नेत्यांना पीएम मोदींचा मंत्र, म्हणाले- ‘सेवा हीच सर्वात मोठी पूजा’

नवी दिल्ली – 2022 मधील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीला सुमारे 124 सदस्य उपस्थित होते. याशिवाय भाजप कार्यकारिणीचे अनेक सदस्य बैठकीत ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना ‘सेवा हीच सर्वात मोठी पूजा’ असा संदेश दिला. ते म्हणाले, या कोरोना काळात कार्यकर्त्यांनी सेवेची नवी संस्कृती सुरू केली असून सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे.
– या राज्यांवर चर्चा
बैठकीची माहिती देताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर या पाच राज्यांमधून अहवाल तयार करण्यात आला. या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबतही चर्चा झाली. या 5 राज्यांमध्ये विशेषतः उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोवा जिंकण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर, हरदीप पुरी उपस्थित होते.
– कोरोना नियमांचे पालन
या बैठकीत मध्य प्रदेशातील एकूण 21 अधिकारी सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार विष्णुदत्त शर्मा यांनी ही माहिती दिली. कोरोना नियमांमुळे आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व सदस्यांना बोलावण्यात आले नाही. तर संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य ऑनलाईन व्हर्चुअल बैठकीत सहभागी झाले होते. नुकतेच भाजपने आपल्या कार्यकारिणीतही फेरबदल केले आहेत. मनेका गांधी आणि त्यांचा मुलगा वरुण गांधी यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आले होते, तर ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव यांचा या संघात समावेश केला होता.





