“पंतप्रधान नरेंद्र मोदी अशक्य गोष्टी शक्य करतात”; उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन असं का म्हणाले?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अशक्य गोष्टी शक्य करण्याची क्षमता आहे, असे कौतुक उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह जगातील अनेक नेत्यांशी मोदी यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोदींचे मैत्रीपूर्ण संबंध –
पंतप्रधानांच्या भाषणांवरील दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात उपराष्ट्रपती राधाकृष्णन बोलत होते. ते म्हणाले, “अमेरिकेने भारतावर ५० टक्के शुल्क लादले असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच पंतप्रधान मोदी यांना आपला चांगला मित्र म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात मतभेद असतानाही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतही मोदी यांचे चांगले संबंध आहेत.”
उपराष्ट्रपतींचे पहिले सार्वजनिक भाषण –
उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात राधाकृष्णन म्हणाले, “अमेरिकेने भारतावर ५० टक्के शुल्क लादले, तरी ट्रम्प नेहमी म्हणतात की मोदी माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी कधीही मोदींविरोधात बोलण्याचा प्रयत्न केला नाही. उलट, ते नेहमी म्हणतात, मी मोदींसोबत आहे.” पुढे ते म्हणाले, “रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि मोदी यांचेही घनिष्ठ मैत्रीचे संबंध आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर मतभेद असतानाही शी जिनपिंग आणि मोदी यांच्यात मैत्री आहे. यामुळेच पंतप्रधान मोदी अशक्य गोष्टी शक्य करतात.”
जनतेच्या भल्यासाठी निःस्वार्थी कार्य –
पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचा उल्लेख करताना राधाकृष्णन म्हणाले, “मोदी जनतेच्या कल्याणासाठी निःस्वार्थीपणे काम करतात आणि त्याबदल्यात कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत.” यावेळी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी जनतेच्या भाषेत बोलतात आणि जनतेच्यासाठीच बोलतात.
लोकांची विचारसरणी बदलली –
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पूर्वी सरकारी योजना केवळ तात्पुरत्या उपाययोजना (बँड-एड) म्हणून काम करत. मात्र, मोदींच्या नेतृत्वाखाली योजनांचा व्यापक प्रचार आणि प्रसार करून लोकांची विचारसरणी बदलली गेली. ते म्हणाले, “मोदी राजकारणाचा उपयोग जनसेवेसाठी करतात आणि त्यांचा प्रत्येक निर्णय हा समाजाच्या भल्याचा विचार करून घेतला जातो.”





