‘मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो’; पाहा पीएम मोदी नेमकं काय म्हणाले?

PM Modi : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. पण अवघ्या आठ महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळला. या घटनेमुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली. विरोधक राज्य सरकारवर तुटून पडले. या घटनेनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रामध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवराय यांचा पुतळा कोसळल्याने मी शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो, अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. मोदी यांनी शिवभक्तांची सूद्धा माफी मागितली. माझे संस्कार वेगळे आहेत असे म्हणत माफी मागितली. सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नसलेल्यांपैकी मी नाही. माझे संस्कार वेगळे आहेत, असे पीएम मोदी म्हणाले. आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराच्या कामाचं भूमीपूजन झालं. तसेच अनेक विकासकामांचं उद्घाटन झालं. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली.
#WATCH | Palghar, Maharashtra: PM Narendra Modi speaks on the Chhatrapati Shivaji Maharaj’s statue collapse incident in Malvan
He says, “Those who consider Chhatrapati Shivaji Maharaj as their deity and have been deeply hurt, I bow my head and apologise to them. Our values are… pic.twitter.com/oLaDLDaWbI
— ANI (@ANI) August 30, 2024
शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत –
पीएम मोदी म्हणाले की, मला पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केल्यानंतर मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन प्रार्थना केली होती. एक भक्त आपल्या आराध्य दैवताची प्रार्थन करतो. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे काही घडलं ते माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. आज मी मस्तक झुकवून मी माझं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या पायावर मस्तक ठेवून माफी मागतो.
ते पुढे म्हणाले की, आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही ते लोक नाही, जे या भूमीचे सुपूत्र वीर सावरकरांना अपमानित करतो, शिव्या देतात. देशभक्तांच्या भावना चिरडतात. तरीही वीर सावरकरांना शिव्या देऊनही माफी मागायला जे तयार नाहीत, ते न्यायालयात लढाई लढायला तयार आहेत. देशाच्या एवढ्या महान सुपूत्राचा अपमान करुन ज्यांना पश्चाताप होत नाही, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे संस्कार ओळखावेत. मी आज महाराष्ट्रात आल्यावर सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याचे काम करत आहे. या घटनेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्या शिवप्रेमींचीही मी माफी मागतो. माझे संस्कार वेगळे आहेत. आमच्यासाठी आमच्या आराध्य दैवताशिवाय काहीही मोठे नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
‘जगातील सर्वात मोठं पोर्ट असणार’ –
दरम्यान, मोदी यांनी वाढवण बंदराविषयी देखील यावेळी माहिती दिली. “या पोर्टवर 76 हजार कोटीहून अधिक जास्त रक्कम खर्च करणार आहोत. हे देशातील सर्वात मोठं कंटेनर पोर्ट असेल. देशच नाही तर जगातील सर्वात मोठं पोर्ट असणार आहे. आज देशातील सर्व कंटेनर पोर्टातून जेवढे कंटेनर येतील जातील, संपूर्ण देशातील मी सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनरचं काम एकट्या वाढवण बंदरात होणार आहे. तुम्ही अंदाजा लावू शकता, हे पोर्ट महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराचा औद्योगिक प्रगतीचं किती मोठं केंद्र होईल”, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.





