पीएम नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर संवाद; काय झाली चर्चा?

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत भारत-अमेरिका व्यापक जागतिक रणनीतिक भागीदारीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट करत या चर्चेविषयी माहिती दिली. त्यांनी लिहिले, “अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत अतिशय सौहार्दपूर्ण आणि महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आम्ही द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचारविनिमय केला. भारत आणि अमेरिका जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करत राहतील.”
Had a very warm and engaging conversation with President Trump. We reviewed the progress in our bilateral relations and discussed regional and international developments. India and the U.S. will continue to work together for global peace, stability and prosperity.…
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2025
विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर भर –
अधिकृत सूत्रांनुसार, दोन्ही नेत्यांनी व्यापार, महत्त्वाच्या तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण आणि सुरक्षा यासह विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक वाढवण्यावर विचारांची देवाणघेवाण केली. दोन्ही नेत्यांनी सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सामूहिक हितसंबंध पुढे नेण्यासाठी जवळच्या सहकार्याने काम करण्यास सहमती दर्शवली, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
व्यापारी कराराच्या वाटाघाटींदरम्यान संवाद –
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रिक स्विट्झर यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेचे एक व्यापारी शिष्टमंडळ द्विपक्षीय व्यापार करारावर (Trade Agreement) वाटाघाटी पुढे नेण्यासाठी भारतात उपस्थित असतानाच ही उच्च-स्तरीय चर्चा झाली, हे विशेष. या चर्चेमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होतील, अशी अपेक्षा आहे.





