Election 2024 : पंतप्रधान मोदींचा तब्बल ‘इतके’ दिवस असणार महाराष्ट्र दौरा; सभा आणि रोड शोच्या माध्यमातून करणार प्रचार

Maharashtra Assembly Election 2024 – महायुतीच्या प्रचाराला भाजपचे कोणकोणते नेते येणार याचीच चर्चा आता सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही सभा महाराष्ट्रात होणार आहेत. पंतप्रधान मोदी सात दिवस महाराष्ट्रात सभा आणि रोड शोच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत.
महायुतीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये जागा वाटपाची बोलणी अजूनही सुरु आहे. भाजपने ९९, शिवसेना शिंदे गटाने ४५ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ३८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
राज्यातील २८८ मतदारसंघासाठी एकाच दिवशी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. १८ तारखेपर्यंत जाहीर प्रचार उमेदवारांना करता येणार आहे. तशा पद्धतीने भाजपच्या नेत्यांकडून मोदींच्या सभांची तयारी केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सात दिवस प्रचारासाठी देणार आहेत. ७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विभागवार सभा घेणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी या सभा होतील आणि तिथेच महायुतीच्या सर्व उमेदवारांना यावे लागणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या या सभा फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठीच होणार नाही तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देखील होणार आहेत. १४ नोव्हेंबरपासून पंतप्रधान विदेश दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील प्रचारासाठी कमी वेळ मिळणार आहे.
नितीन गडकरी प्रचारात उतरणार का?
नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही सभा महाराष्ट्रात होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अजून प्रचारापासून दूर राहिलेले आहेत, ते येत्या काही दिवसांत सक्रीय होतात का, हे पाहणेही महत्त्वाचे राहणार आहे.





