PM मोदींचा युक्रेनमधील भारतीयांशी संवाद; भारतीयांनी सांगितले आपले अनुभव….

किव्ह – पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पोलंड भेटीनंतर आज रेल्वेमार्गाने युक्रेनमध्ये दाखल झाले. त्यांनी येथे राहणाऱ्या भारतीयांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला आणि यावेळी भारतीयांनी मोदींना आपले अनुभव सांगितले.
तसेच मोदी यांच्या भेटीचे अनुभवही काहींनी सोशल मीडियावर कथन केले आहे. मोदी यांना भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यातील काही जणांनी व्यक्त केली. युक्रेन तुमची वाट पाहतो आहे असे या लोकांनी त्यांना सांगितल्यावर मी आलो आहे असे मोदी म्हणाले.
एका लहान मुलीने सांगितले की तिने मोदी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी तिला आशीर्वादही दिला तर काही महिलांनी मोदींसोबत सेल्फी काढले. एकुणातच मोदींनी बहुतेक भारतीयांशी हस्तांदोलन केले आणि प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न केला. यामुळे तेथील भारतीयांमध्ये भारावलेपणाची भावना होती असे पाहायला मिळाले.
तत्पूर्वी दहा तासांचा रेल्वे प्रवास करून मोदी युक्रेनमध्ये आले होते. युध्दामुळे या भागात विमान वाहतूक थांबली असल्यामुळे मोदींनी रेल्वे प्रवासाद्वारे युक्रेन गाठले. मोदी यांच्या अगोदर अमेरिकेच्या अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह बहुतांश प्रमुख नेत्यांनाही रेल्वेनेच प्रवास करावा लागला आहे.





