नवी दिल्ली- सामान्य नागरिकांचे माहागाईने कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांच्या खिशावर मोठा भार पडला आहे. अशातच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना तेलावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन आज झालेल्या आढावा बैठकीमध्ये केले आहे. मोदींचे हे आवाहन राज्यांनी स्विकारले तर तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आढावा बैठकीमध्ये म्हणाले की, राज्य सरकारांनी देशाच्या हितासाठी तेलावरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा. यापूर्वीही पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांची आढावा बैठक आज पंतप्रधानांनी घेतली यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांत भाजप शासित राज्यांच्या वतीने व्हॅटचे दर कमी करून जनतेला दिलासा देण्यात आला होता. आर्थिक आघाडीवर राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे ते म्हणाले. देशाच्या हितासाठी राज्यांनी हे पाऊल उचलले पाहिजे. केंद्राच्या आवाहनानंतरही काही राज्यांनी व्हॅट कमी केलेला नाही. असेही पंतप्रधान म्हणाले आहेत.