नवी दिल्ली – जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमध्ये मोठी घट झाली असल्याचा दावा एका सर्वक्षणाद्वारे करण्यात आला आहे. इंडिया टुडे समूहातर्फे घेण्यात आलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणातून यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये पंतप्रधानांची ३८ टक्के असलेली लोकप्रियता ऑगस्ट महिन्यामध्ये २४ टक्क्यांपर्यंत खाली आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. PM Modi popularity decreased – India today survey
देशासाठी करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट अत्यंत घातक ठरली होती. ही परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. करोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला आलेल्या अपयशामुळेच मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचा दावा आता पुन्हा एकदा करण्यात येत आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये पंतप्रधानांची लोकप्रियता ६६ टक्के इतकी होती. यानंतर जानेवारी २०२१ मध्ये ती घटून ३८ टक्क्यांपर्यंत खाली आली होती. ऑगस्ट महिन्यातील नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार यात आणखी घट होऊन मोदींची लोकप्रियता २४ टक्क्यांवर आली आहे.
सर्वेक्षणानुसार, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घटली असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेमध्ये मात्र वाढ झाल्याचं समोर आलंय. योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधानपदाच्या दाबावेदारांच्या यादीत मोदींखालोखाल दुसरे स्थान मिळाले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ११ टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून योगींच्या नावाला पसंती दर्शवली आहे. यापूर्वी त्यांना जानेवारी २०२१ मध्ये १० टक्के तर ऑगस्ट २०२० मध्ये ३ टक्के लोकांनी पसंती दिली होती.
भारताचा पुढील पंतप्रधान म्हणून तुमची पसंती कोणाला? या प्रश्नावर मोदी व योगींनंतर राहुल गांधी यांच्या नावाला पसंती मिळाली आहे. राहुल गांधी यांना १० टक्के मतं मिळाली आहेत. त्यांना ऑगस्ट २०२० मध्ये ७ टक्के तर जानेवारी २०२१ मध्ये ७ टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती.
पश्चिम बंगला विधानसभा निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी यांच्या प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. ऑगस्ट २०२० मध्ये पुढील पंतप्रधान म्हणून तुमची पसंती कोणाला? या प्रश्नावर ममता यांना केवळ २ टक्के लोकांनी पसंती दिली होती. तर जानेवारी २०२१ मध्ये त्यांची लोकप्रियता वाढून ४ टक्के झाली होती.
मात्र विधानसभा निवडणुकांनंतर आता त्यांच्या नावाला ८ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये ममता बॅनर्जी यांचे नाव अमित शाह यांच्या वर आहे. शाह यांना ७ टक्के लोकांनी भावी पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे.