G20 परिषदेत PM मोदींनी मांडले 3 महत्त्वाचे प्रस्ताव; अमली पदार्थ-दहशतवाद, कौशल्य वृद्धीवर लक्ष

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका): जी-२० परिषदेत सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी महत्त्वपूर्ण समस्यांवर चर्चा करत असतात. नोव्हेंबर महिन्यात सर्व राष्ट्रांचे प्रमुख वार्षिक शिखर परिषदेसाठी भेटतात. यावर्षी आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवीन महत्त्वपूर्ण उपक्रम/प्रस्तावांची रूपरेषा मांडली, ज्यामुळे जागतिक स्तरावर विविध समस्यांवर उपाय शोधले जातील.
या प्रस्तावांमध्ये प्रामुख्याने अमली पदार्थ आणि दहशतवाद यांच्यातील संबंध तोडणे आणि आफ्रिकेतील कौशल्य विकासाला चालना देणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
प्रमुख उपक्रम आणि ठळक मुद्दे:
१. अमली पदार्थ-दहशतवाद विरोधी G20 उपक्रम (G20 Initiative on Countering the Drug–Terror Nexus):
या उपक्रमाचा उद्देश वित्तीय, प्रशासकीय आणि सुरक्षा साधनांना एकत्र आणणे हा आहे. यामुळे अमली पदार्थांची तस्करी करणारी नेटवर्क्स (जाळे) विस्कळीत करण्यास, अवैध आर्थिक प्रवाह रोखण्यास आणि दहशतवादासाठी मिळणारा मोठा निधीचा स्रोत कमकुवत करण्यास मदत होईल, असे वृत्तसंस्था ANI ने नमूद केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी हा उपक्रम दहशतवादाच्या फंडिंगवर आघात करणारा असल्याचे स्पष्ट केले.
#WATCH | Johannesburg, South Africa | Prime Minister Narendra Modi attends the G-20 Summit
(Source: Reuters/Host Broadcaster Pool) pic.twitter.com/NtDmjfl0cF
— ANI (@ANI) November 22, 2025
२. G20-आफ्रिका कौशल्य वृद्धी उपक्रम (G20-Africa Skills Multiplier Initiative):
पुढील दशकात आफ्रिकेत १० लाख प्रमाणित प्रशिक्षक (Certified Trainers) तयार करण्याचे सामूहिक उद्दिष्ट या उपक्रमाद्वारे ठेवण्यात आले आहे. यामुळे आफ्रिकेतील तरुणांना रोजगारक्षम बनण्यास मोठी मदत मिळणार आहे.
३. जागतिक पारंपरिक ज्ञान भांडार (Global Traditional Knowledge Repository):
पर्यावरण-संतुलित, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि सामाजिकदृष्ट्या सुसंवादी जीवनशैली जपण्यासाठी या भांडाराची स्थापना प्रस्तावित आहे.
“भारताचा यासंदर्भात समृद्ध इतिहास आहे. यामुळे चांगल्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आमचे सामूहिक ज्ञान पुढे नेण्यास मदत होईल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Spoke at the first session of the G20 Summit in Johannesburg, South Africa, which focussed on inclusive and sustainable growth. With Africa hosting the G20 Summit for the first time, NOW is the right moment for us to revisit our development parameters and focus on growth that is… pic.twitter.com/AxHki7WegR
— Narendra Modi (@narendramodi) November 22, 2025
इतर महत्त्वाचे प्रस्ताव:
पंतप्रधान मोदींनी याशिवाय G20 जागतिक आरोग्य सेवा प्रतिसाद पथकाचा (G20 Global Healthcare Response Team) प्रस्तावही मांडला, जो आरोग्य आणीबाणी आणि नैसर्गिक आपत्त्यांना सामोरे जाण्यासाठी उपयुक्त ठरेल.
‘आता योग्य वेळ आहे…’ PM मोदींचे ‘X’ वर मत:
पंतप्रधान मोदी यांनी परिषदेत केलेल्या भाषणाबद्दल सोशल मीडियावर ‘X’ द्वारे आपली भावना व्यक्त केली. “समावेशक आणि शाश्वत वाढीवर लक्ष केंद्रित असलेल्या G20 परिषदेच्या पहिल्या सत्रात बोललो. आफ्रिकेकडून प्रथमच G20 परिषदेचे आयोजन होत असताना, आपल्या विकासाचे मापदंड तपासावेत आणि समावेशक व शाश्वत वाढीवर लक्ष केंद्रित करण्याची ‘आता योग्य वेळ’ आहे. भारताची सभ्यतामूल्ये, विशेषत: एकात्म मानवतेचे तत्त्व पुढे जाण्याचा मार्ग दाखवते,” असे पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या उपक्रमांमुळे केवळ भारत-आफ्रिका संबंधांना नव्हे, तर जागतिक शांतता, आरोग्य आणि शाश्वत विकासाच्या प्रयत्नांना बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.





