पंतप्रधान मोदींनी घेतली दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची भेट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी यावेळी भारत – संयुक्त अरब अमिराती मधील संबंध वृद्धिंगत करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील धोरणात्मक भागीदारी सर्वसमावेशक करण्यात दुबईने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे ते म्हणाले.
दुबईचे युवराज महामहिम शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांना भेटून आनंद झाला. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील धोरणात्मक भागीदारी सर्वसमावेशक करण्यात दुबईने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या विशेष भेटीमुळे दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेली घनिष्ठ मैत्री अधिक दृढ होऊन भविष्यात आणखी मजबूत सहकार्याचा मार्ग खुला होईल. असे पंतप्रधांनी एक्सवरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींबरोबरच्या भेटीपूर्वी दुबईच्या युवराजांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली. भारताबरोबर व्यापक स्वरुपाचे बागीदारीचे संबंध प्रस्थापित करणे आणि बारताला प्राधान्य देण्यासंदर्भात दुबईच्या युवराजांनी व्यक्त केलेल्या भावनांबद्दल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
युवराज हमदान यांच्याबरोबरची चर्चा सकारात्मक होती, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. संयुक्त अरब अमिरातीबरोबर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी हा भारतासाठी अत्यंत प्राधान्याचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात, भारत संरक्षण सहकार्य, सह-उत्पादन आणि सह-विकास प्रकल्प, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात जवळून काम करण्यास उत्सुक आहे. भारत आणि युएई दोघेही या प्रदेशात शांतता आणि समृद्धीसाठी काम करण्यास वचनबद्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले. युएइचे युवराज दोन दिवसांच्या भारत भेटीवर आज नवी दिल्लीत दाखल झाले. राज्य मंत्री सुरेश गोपी यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.





