Thirukkural : पीएम मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना दिलेल्या ‘तिरुक्कुरल’ ग्रंथात नेमकं काय आहे?
Thirukkural : ब्रिक्स शिखर परिषदेत पीएम मोदींनी पुतिन यांना ‘तिरुक्कुरल’चा रशियन अनुवाद भेट दिला. 1,330 दोह्यांच्या या ग्रंथाचे भारत-रशिया संबंधांशी जुने नाते जाणून घ्या.

BRICS Summit 2026 : ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. या भेटीत मोदी यांनी पुतिन यांना महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरल’चा रशियन अनुवाद भेट दिला. ही भेट भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेसोबतच भारत-रशिया यांच्यातील जुने साहित्यिक आणि सांस्कृतिक संबंध अधोरेखित करणारी ठरली आहे.
‘तिरुक्कुरल’ची रचना तमिळ कवी आणि संत तिरुवल्लुवर यांनी केली आहे. या ग्रंथात 133 अध्याय आणि 1,330 छोटे दोहे आहेत. नीती, शासन, संपत्ती, मैत्री, मानवी संबंध आणि प्रेम अशा जीवनातील विविध विषयांवर या दोह्यांमधून मार्गदर्शन करण्यात आले आहे.
#WATCH | Delhi | Prime Minister Narendra Modi presented Russian President Vladimir Putin with a Russian translation of the Thirukkural, an ancient Tamil classic.
(Video Source: DD News) https://t.co/IqgVVcIq59
— ANI (@ANI) September 11, 2026
या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील विचार कोणत्याही एका काळापुरते किंवा विशिष्ट धार्मिक चौकटीपुरते मर्यादित नाहीत. नेतृत्व, न्याय, सामाजिक जबाबदारी आणि चांगले आचरण याबाबतचे विचार आजही महत्त्वाचे मानले जातात.
रशियाशी ‘तिरुक्कुरल’चे जुने नाते
‘तिरुक्कुरल’चा रशियाशी संबंधही जुना आहे. 1963 मध्ये मॉस्को येथे जे. जे. ग्लाझोव आणि ए. कृष्णमूर्ती यांनी या ग्रंथाचा पहिला रशियन अनुवाद प्रकाशित केला होता. त्यानंतर रशियातील विद्वानांनी तमिळ साहित्याचा अभ्यास केला.
त्यामुळे मोदी यांनी पुतिन यांना ‘तिरुक्कुरल’ भेट देणे ही केवळ औपचारिक भेट नव्हती. भारत आणि रशिया यांच्यात आधीपासून असलेल्या सांस्कृतिक संबंधांची आठवण करून देणारा हा प्रयत्न होता.
‘तिरुक्कुरल’मधील सार्वत्रिक विचारांच्या माध्यमातून भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाचे महत्त्वही अधोरेखित केले. भारताची कूटनीती केवळ करार आणि राजकीय संबंधांपुरती मर्यादित नसून, त्यामागे प्राचीन विचार, मूल्ये आणि सांस्कृतिक संबंधांची मोठी परंपरा असल्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला.
दरम्यान, १८ वी ब्रिक्स शिखर परिषद १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीत (भारत मंडपम) होत आहे. यात ११ सदस्य देश आणि विविध भागीदार देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.





