PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर दाखल; इस्रायलच्या संसदेला करणार संबोधित

PM Modi Israel Visit – पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भेटीसाठी आज इस्रायलमध्ये दाखल झाले. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा यांनी यांनी बेन गुरिओन विमानतलावर मोदींचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी पारंपारिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान मोदी गेल्या ९ वर्षात दुसऱ्यांदा इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्यावेळी पंतप्रधान मोदी इस्रायलच्या संसदेला संबोधित करणार आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याबरोबर त्यांची गुरुवारी विविध विषयांवर विस्तृत द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
भारत आणि इस्रायल यांच्यात मजबूत आणि बहुआयामी धोरणात्मक भागीदारी असून अलीकडच्या वर्षांत त्यात उल्लेखनीय वाढ आणि गतिमानता दिसून आली आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान, नवोन्मेष, कृषी, जल व्यवस्थापन, तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक तसेच लोकांमधील संबंध यासह विविध क्षेत्रांमध्ये आमचे सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी चर्चेसाठी मी उत्सुक आहे.
आम्ही परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरदेखील एकमेकांचे विचार जाणून घेऊ , असे पंतप्रधानांनी इस्रायलला रवाना होण्यारपुर्वी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
अमेरिका आणि इराणमधील संबंध खालावल्याने मध्यपूर्वेमध्ये तणाव निर्माण झालेला असताना पंतप्रधान मोदींचा हा इस्रायल दौरा होतो आहे. संरक्षण, वैज्ञानिक संशोधन, सायबर सुरक्षा आणि नाविन्य या क्षेत्रात भारत आणि इस्रायलमधील संबंधात अलिकडच्या काळात खूप चढउतार झाले आहेत.
इस्रायलकडून भारताला शस्त्रे आणि लष्करी उपकरणे निर्यात केली जात असल्यामुळे दोन्ही देशांमध्ये संरक्षण भागीदारी हा एक महत्वाचा स्तंभ राहिला. दोन्ही देशात मुक्त व्यापार कराराविषयीच्या वाटाघाटीही सुरू आहेत. सप्टेंबर महिन्यात आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी द्विपक्षीय गुंतवणूक करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.





