PM-KISAN : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येणार, तारीख जाहीर
PM-KISAN : PM-KISAN योजनेचा 24वा हप्ता 30 ऑक्टोबर 2026 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि भू-सत्यापन तपासा.

PM-KISAN : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचा २४वा हप्ता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. केंद्राच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे पुढील हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी पीएम-किसान योजनेचा २३वा हप्ता २० जून २०२६ रोजी जारी करण्यात आला होता. त्यानंतर चार महिन्यांहून अधिक काळ उलटल्याने २४वा हप्ता नेमका कधी मिळणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ ऑक्टोबरच्या वाराणसी दौऱ्यादरम्यान हप्ता जाहीर होण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. मात्र, आता ३० ऑक्टोबर ही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
वर्षाला मिळतात ६ हजार रुपये
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम एकाच वेळी न देता २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक हप्ता थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBTच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
Direct Support, Stronger Farmers!
Mark your calendar! The 24th instalment of PM-KISAN is set to be released on 30th October 2026, empowering our Annadatas with continued financial support.
#PMKISAN #PMKISAN24thInstalment #pmkisan #agrigoi https://t.co/rMOXj7R9NP
— PM Kisan Samman Nidhi (@pmkisanofficial) October 23, 2026
त्यामुळे ३० ऑक्टोबरला पात्र लाभार्थ्यांना २ हजार रुपयांचा २४वा हप्ता मिळणार आहे.
हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी महत्त्वाची
पीएम-किसानचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. ई-केवायसी अपूर्ण असल्यास हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
आधार आणि बँक खात्याची माहिती तपासा
शेतकऱ्यांनी पीएम-किसान अर्जामध्ये दिलेली माहिती आणि आधार कार्डावरील माहिती तपासावी. नाव, आधार क्रमांक किंवा इतर तपशीलात तफावत असल्यास हप्ता जमा होण्यास अडचण येऊ शकते. तसेच बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही, हेही तपासणे महत्त्वाचे आहे.
आधारशी जोडलेला मोबाइल क्रमांक सुरू असणेही आवश्यक आहे. यामुळे योजनेशी संबंधित महत्त्वाचे संदेश आणि सूचना मिळण्यास मदत होते.
लाभार्थी यादीत नाव तपासा
२४वा हप्ता मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांनी पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाइट किंवा पीएम-किसान अॅपवर जाऊन लाभार्थी यादीत आपले नाव आहे का, हे तपासावे. नाव यादीत असल्यास आणि आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण असल्यास हप्ता मिळण्याची शक्यता असते.
जर नाव दिसत नसेल किंवा ई-केवायसी, भू-सत्यापन यांसारखी प्रक्रिया अपूर्ण असल्याचे दिसत असेल, तर ती पूर्ण करून घ्यावी. त्यामुळे हप्ता मिळण्याच्या प्रक्रियेत अडथळे टाळता येऊ शकतात.
शेतकऱ्यांनी ३० ऑक्टोबरपूर्वी आपली ई-केवायसी, आधार-बँक लिंकिंग, बँक तपशील आणि भू-सत्यापनाची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे.





