PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेला 2030-31 पर्यंत मुदतवाढ; 3.15 लाख कोटींच्या खर्चाला मंजुरी
PM Kisan Yojana : केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजना 2030-31 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 3.15 लाख कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळत राहणार आहे.

PM Kisan Yojana : केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेला 2030-31 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या योजनेसाठी 3.15 लाख कोटी रुपयांच्या एकूण खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षेही दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळत राहणार आहे.
PM किसान योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना असून आर्थिकदृष्ट्या पात्र शेतकरी कुटुंबांना थेट आर्थिक सहाय्य देणे हा तिचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात.
ही रक्कम एकरकमी न देता प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये, म्हणजेच साधारण चार महिन्यांच्या अंतराने, थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
PM किसान योजनेसाठी नोंदणी कशी करावी?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकरी PM किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. तसेच संबंधित राज्याच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊनही अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे –
आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमिनीच्या मालकीचे (भूमी अभिलेख) दस्तऐवज.
लाभार्थी स्थिती (Beneficiary Status) कशी तपासाल?
लाभार्थी आपल्या अर्जाची आणि हप्त्यांची माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासू शकतात. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. ‘Farmers Corner’ विभागातील ‘Beneficiary Status’ पर्याय निवडा. आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा. त्यानंतर पेमेंटची माहिती, हप्त्यांचा इतिहास आणि पात्रतेची स्थिती पाहता येईल.
आतापर्यंत किती हप्ते वितरित?
PM किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 23 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. 23व्या हप्त्याअंतर्गत 9.49 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, त्यासाठी 18,984 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली होती.





