पुणे मेट्रोच्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ; स्वच्छतागृहात दुर्गंधीयुक्त पाणी

पुणे : मेट्रोच्या पुणे रेल्वे स्टेशन स्थाकातील चक्क टॉयलेटमध्ये सांडपाणी येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे पाणी दुर्गंधीयुक्त असून त्याचा वापर केला गेल्यास त्वचेचे गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांनी याबाबत महामेट्रोकडे तसेच स्थानकाच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, महामेट्रोकडून त्यावर काहीच उपाय योजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे.
मेट्रोचे स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी हे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून दैनंदिन दिड लाखाहून अधिक प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. मात्र, मेट्रो स्थानकांच्या स्वच्छतागृहांबाबत मोठया प्रमाणात तक्रारी आहेत. पुणे रेल्वे स्थानकावर आल्यानंतर दररोज शेकडो प्रवासी मेट्रोच्या पुणे स्टेशन मेट्रो स्थानकावरून इच्छीत स्थळी जातात.
त्यामुळे अनेकदा प्रवासी मेट्रोच्या स्वच्छतागृहाचा वापर करतात. मात्र, या ठिकाणी कमोड असलेल्या स्वच्छतागृहात फ्लश् केल्यानंतर चक्क सांडपाणी येत असून त्याचा उग्र वास येत आहे. याबाबत वारंवार प्रवासी स्थानकाच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रारी करत असून त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे, असे स्वच्छतागृह वापरल्यास प्रवाशांना गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असून याला जबाबदार कोण? असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.





